आमची माफी मागितली…, पाकिस्तानचा दावा; बहिष्काराचा निर्णय मागे घेण्याचं सांगितलं कारण

एशिया कप 2025 पाक वि यूएई: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेवर (Asia Cup 2025) बहिष्कार टाकण्याची धमकी मागे घेतल्यानंतर पाकिस्तानने 17 सप्टेंबर रोजी अखेरच्या साखळी सामन्यात कडवी झुंज दिलेल्या यूएईचा 41 धावांनी (Pak vs UAE) पराभव केला. याविजयासह पाकिस्तानने सुपर फोर फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यामुळे 21 सप्टेंबर रोजी आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने येणार आहेत.

पाकिस्तान आणि यूएईच्या सामन्याआधी चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. सामना सुरु होण्याआधी पाकिस्तानने आशिया चषकातून बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून हटविण्याची दोनदा मागणी केली होती. आयसीसीने ही मागणी फेटाळल्याने पाकिस्तानचा संघ हॉटेलमध्येच थांबून होता. पीसीबी-आयसीसी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर यूएई विरुद्ध सामन्यात पायक्रॉफ्ट हेच सामनाधिकारी राहतील, असे आयसीसीने स्पष्ट केले. यानंतर पीसीबी चेअरमन मोहसीन नकवी यांनी संघाला स्टेडियमकडे कूच करण्यास सांगितले. त्यानंतर एक तास उशिराने पाकिस्तान आणि यूएईचा सामना सुरु झाला.

अँडी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्याचा पाकिस्तानचा दावा-

पीसीबीने एका निवेदनाद्वारे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तान संघ व्यवस्थापक व कर्णधाराची माफी मागितल्याचा दावा केला. पीसीबीने म्हटले की, अँडी पायक्रॉफ्ट यांनी भारत व पाकिस्तानच्या कर्णधारांना हस्तांदोलन करण्यास मनाई केली होती. अँडी पायक्रॉफ्ट यांनी 14 सप्टेंबरच्या घटनेला गैरसमज झाल्याचे सांगून माफी मागितली आहे. तसेच आयसीसीने याप्रकरणी चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे, असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. हा सामना संपल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चांगलीच झोंबली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट आयसीसीकडे तक्रार करत सामन्यातील मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. मात्र पाकिस्तान बोर्डाची ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यामध्ये अँडी पायक्रॉफ्ट यांची भूमिका मोठी नव्हती, असं आयसीसीनं स्पष्ट केलं.

पाकिस्तान आणि यूएईचा सामना कसा राहिला? (Pakistan vs UAE)

यूएई विरुद्धच्या ‘करो या मरो’च्या सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानने सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला. पाकिस्तानने यूएईचा 41 धावांनी पराभव केला. 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईचा संघ 17.4 षटकांत 105 धावांवर गारद झाला. भारत आणि पाकिस्तान आता ग्रुप अ मधून सुपर फोरमध्ये पात्र ठरले आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

मोठी बातमी : पाकिस्तानची आशिया चषकातून माघार, टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर मोठा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.