पंतप्रधानांच्या आईचा एआय व्हिडिओ हटवा

उच्च न्यायालयाचा काँग्रेसला आदेश

वृत्तसंस्था/ पाटणा

काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवंगत मातेचा आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवावा लागणार आहे. पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेसला हा आदेश दिला आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडिओ हटवावा लागेल असे न्यायालयाने काँग्रेसला बजावले आहे.

काँग्रेसच्या बिहार शाखेने एक एआय व्हिडिओ जारी केला होता, ज्यात पंतप्रधान मोदींच्या मातेला दाखविण्यात आले होते. या व्हिडिओवरून मोठा वाद झाला होता आणि भाजपने याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातेचा अपमान ठरविले होते. तर काँग्रेसने व्हिडिओत मोदींच्या मातेचा अपमान कुठेच करण्यात आला नसल्याचा दावा केला होता.

संबंधित व्हिडिओ हटविण्याचा आदेश पाटणा उच्च न्यायालयाचे अंतरिम मुख्य न्यायाधीश पी.बी. बाजंतरी यांनी दिली आहे. बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून तेथे पंतप्रधान मोदींच्या मातेचा अपमान हा पूर्वीच मुद्दा ठरला आहे. या व्हिडिओमुळे काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले होते, परंतु काँग्रेसने हा व्हिडिओ हटविण्यास नकार दिला होता. तर यापूर्वी राजद आणि काँग्रेसच्या एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने पंतप्रधान मोदींच्या मातेला उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले होते. याप्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच काँग्रेसला लक्ष्य केले होते.

माझ्या मातेचे राजकारणाशी कुठलेच देणेघेणे नव्हते. तरीही तिच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यं करण्यात आली आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी जाहीरसभेत केला होता. या मुद्द्यावरून वाद वाढल्यावर बिहार काँग्रेसने एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओद्वारे काँग्रेस पंतप्रधान मोदींवर मातेच्या नावाखाली राजकारण करू पाहत असल्याचा आरोप करू इच्छित होता. परंतु हा डाव देखील काँग्रेसवरच उलटला आहे. आता अखेर उच्च न्यायालयानेच काँग्रेसला हा व्हिडिओ हटविण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस नेत्यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला होता.

राजकीय ईर्ष्येमुळेच काँग्रेसची दुर्दशा

पंतप्रधान मोदींच्या मातेचा एआयद्वारे व्हिडिओ तयार करत काँग्रेसने केलेली कृती अत्यंत आक्षेपार्ह होती. कुणाच्याही आईवडिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे कायदेशीर गुन्हा आहे. राजकीय ईर्ष्येमुळेच काँग्रेसची राजकीय दुर्दशा होत असल्याची टीका संजदचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी केली आहे.

Comments are closed.