बंगालच्या उपसागरात मोठ्या क्षेपणास्त्र चाचणीची तयारी

नोटॅम जारी : 24-25 सप्टेंबर कालावधीत होणार परीक्षण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत लवकरच बंगालच्या उपसागरात एक महत्त्वपूर्ण रणनीतिक क्षेपणास्त्र परीक्षण करणार आहे. याकरता 24-25 सप्टेंबर दरम्यान एक नोटॅम (नोटीस टू एअरमेन) जारी करण्यात आला असून यात बंगालच्या उपसागराच्या एका हिस्स्याला नो-फ्लोय झोन घोषित करण्यात आले आहे.

हे परीक्षण 1400 किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्यापर्यंत असू शकते. यामुळे हे शक्तिशाली आणि दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र राहणार असल्याचे स्पष्ट होते. हे परीक्षण ओडिशा किनाऱ्यावर अब्दुल कलाम बेटावरुन होणार आहे. डीआरडीओ या मोठ्या क्षेपणास्त्र परीक्षणाची तयारी करत आहे. हे मध्यम किंवा दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र असू शकते, ज्यात अग्नि-प्राइमचे नाव समोर येत आहे. अग्नि-प्राइम एक नव्या पिढीचे मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा मारक पल्ला 1000-2000 किलोमीटरपर्यंत आहे. नोटॅममध्ये नमूद 1400 किलोमीटरपेक्षा अधिकचे अंतर हे रणनीतिक आणि शक्तिशाली क्षेपणास्त्र असेल याचे संकेत देणारे आहे.

भारताची क्षेपणास्त्र शक्ती

मागील काही वर्षांमध्ये डीआरडीओने दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक आणि व्रूज क्षेपणास्त्रांच्या विकासात जबरदस्त प्रगती केली आहे. यामुळे भारताची क्षेत्रीय आणि सैन्यक्षमता मजबूत झाली आहे. आगामी आठवड्यांमध्ये आणखी अनेक क्षेपणास्त्रांचे परीक्षण होणार असून यात वेगवेगळ्या रणनीतिक भूमिकांसाठीची क्षेपणास्त्रs सामील आहेत. शस्त्रास्त्रभांडार आधुनिक आणि भविष्याच्या सुरक्षा आव्हानांना सामोरा जाण्यास सक्षम असावा असे लक्ष्य आहे. हे क्षेपणास्त्र परीक्षण क्षेत्रात वाढत्या सुरक्षा आव्हानांदरम्यान भारताच्या रणनीतिक शक्तीला कायम राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

अलिकडच्या काळातील यशस्वी परीक्षणं

अग्नि-5 (20 ऑगस्ट) : हे 5000 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्याचे मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचे परीक्षण ओडिशाच्या चांदीपूरमध्ये आयटीआरमधून करण्यात आले. या क्षेपणास्त्राने सर्व तांत्रिक आणि संचालन मापदंडांची पूर्तता केली. अग्नि-5 पूर्ण आशिया, उत्तर चीन आणि युरोपच्या काही हिस्स्यांना स्वत:च्या कक्षेत आणू शकते असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

पृथ्वी-2 : हे आण्विक-सक्षम कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून याचे यशस्वी परीक्षण मागील महिन्यात झाले होते.

अग्नि-1 : हे देखील आण्विक-सक्षम कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून याचे परीक्षण अलिकडेच पार पडले आहे.

अग्नि-प्राइम : नव्या पिढीचे क्षेपणास्त्र

यावेळी परीक्षण होणारे क्षेपणास्त्र अग्नि-प्राइम असू शकते. हे क्षेपणास्त्र कमी वजनाचे, वेगवान आणि अधिक अचूक आहे. हे जुन्या अग्नि क्षेपणास्त्रांच्या तुलनेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. अग्नि-प्राइमचा मारक पल्ला 1000-2000 किलोमीटर आहे. हा मारक पल्ला याला क्षेत्रीय रक्षणासाठी प्रभावी स्वरुप मिळवून देतो. याचा छोटा आकार आणि गतिशीलता याला डागण्याची प्रक्रिया सोपी करते.

Comments are closed.