साहित्य संघाच्या निवडणुकीत कुणाची सरशी? रात्री मतमोजणी उशिरापर्यंत सुरू

गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या बहुचर्चित पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली. त्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. अंदाजे 640 मतपत्रिका प्राप्त झाल्या असून रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य संघाच्या निवडणुकीकडे समस्त साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. ऊर्जा पॅनेल आणि डॉ. भालेराव विचारमंच हे दोन गट आमनेसामने आहेत. गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या आरोप- प्रत्यारोपामुळे वातावरण तापले आहे. दोन्ही गटांतील उमेदवारांनी मतचोरीचा आरोप केला आहे. त्यातच निवडणुकीत भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मतदान केल्याचा पह्टो नुकताच व्हायरल झाला होता. आमदार लोढा आणि मराठी साहित्याचा संबंध काय, असा सवाल साहित्यप्रेमींनी विचारला होता.
निवडणुकीची मतमोजणी 3 सप्टेंबरला होणे अपेक्षित होते, मात्र काही मतदारांना मतपत्रिका न पोचल्याने 17 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अखेरच्या दिवसापर्यंत मतपत्रिका पोहोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे मुदतवाढीची मागणी करण्यात आली. टपाल खात्याचा घोळ कायम राहिल्याने मुंबईतील काही मतदारांनाही मतपत्रिका मिळाल्या नाहीत. अशांना साहित्य संघात येऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र हे मतदार साहित्य संघापर्यंत पोचले नाहीत, असे दोन्ही गटांतर्फे सांगण्यात आले होते. मुंबई मराठी साहित्य संघाचे अंदाजे 1400 सभासद आहेत. त्यापैकी 640 जणांच्या मतपत्रिका आलेल्या आहेत. एक अध्यक्ष, सात उपाध्यक्ष आणि 35 नियामक मंडळ सदस्यपदासाठी निवडणूक होत आहे. ऊर्जा पॅनेलतर्फे डॉ. उषा तांबे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत तर डॉ. भालेराव विचार मंचतर्फे किशोर रांगणेकर अध्यक्ष पदासाठी उभे आहेत.
Comments are closed.