हिंदुस्थान ‘अ’चे चोख प्रत्युत्तर, ध्रुव जुरेलच्या शतकामुळे दिवसअखेर 4 बाद 403

यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलच्या नाबाद 113 धावांच्या झंझावाती खेळीमुळे हिंदुस्थान ‘अ’ने ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या अनौपचारिक कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवशी 4 बाद 403 असे चोख प्रत्युत्तर दिले. गेल्या दोन दिवसांप्रमाणे तिसऱया दिवशीही पावसाच्या कृपादृष्टीमुळे पूर्ण खेळ होऊ शकला नाही. तिसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा देवदत्त पडिक्कल 86 तर जुरेल 113 धावांवर खेळत होते.

बुधवारी 1 बाद 116 अशा स्थितीत असलेल्या हिंदुस्थान ‘अ’च्या डावाला नारायण जगदीशन, साई सुदर्शननंतर देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेलनेही खणखणीत खेळय़ा केल्या. बुधवारच्या नाबाद जगदीशनची खेळी 64 धावांवर संपली. पुढे साई सुदर्शनने देवदत्त पडिक्कलसह 76 धावांची भागी रचत संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला. पण साई बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या 8 धावांवर बाद झाल्याने संघाने चौथी विकेट गमावली.

जुरेल-पडिक्कलची भागी

त्यानंतर मात्र देवदत्तच्या साथीने ध्रुव जुरेलने जोरदार फटकेबाजी करत पाचव्या विकेटसाठी 181 धावांची भागी रचत संघाला चारशेचा टप्पा गाठून दिला. या भागीच्या जोरावरच हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलियन संघाला चोख प्रत्युत्तर दिले. जुरेलने 4 षटकार आणि 10 चौकार खेचत 132 चेंडूंत नाबाद 113 धावा केल्या तर पडिक्कलने 178 चेंडूंत 86 धावा करत संयमी खेळ केला. उद्या त्यालाही शतक साजरे करण्याची संधी आहे. मात्र ज्या वेगाने ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली त्या वेगात दोघांना धावा करता आल्या नाहीत. तिसऱया दिवशीही पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 63 षटकांचाच खेळ होऊ शकला.

Comments are closed.