पंजाबमध्ये अमेरिकेतील महिलेची हत्या झाली
इंग्लंडमधील 67 वर्षीय इसमाकडून हत्येचा कट
लुधियाना: पंजाबच्या लुधियाना येथील धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरविले आहे. अमेरिकेतून आलेली 69 वर्षीय एनआरआय महिला रुपिंदर कौर पंधेरची हत्या करण्यात आली आहे. रुपिंदरचा मृतदेह लुधियानानजीक घुंगराना गावातील एका नाल्यातून हस्तगत करण्यात आला आहे. यापूर्वी रुपिंदर रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झाली होती. रुपिंदरचा तोडण्यात आलेला आयफोनही मिळाला असून आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी तो फेकून दिला होता. रुपिंदरची हत्या तिच्या भावी पतीने करविली असल्याचे तपासात समोर आले. तिचा भावी पती इंग्लंडमध्ये राहणारा असून त्याचे नाव चरनजीत सिंह ग्रेवाल असून तो 67 वर्षांचा आहे. रुपिंदरसोबतचा विवाह टाळण्यासाठी चरनजीतने तिच्या हत्येचा कट रचला होता. याकरता त्याने सुखजीत सिंहला हत्येची सुपारी दिली होती. सुखजीतने पोलिसांसमोर रुपिंदरची हत्या केल्याची कबुली दिली आहे. 12 जुलै रोजी सुखजीतने स्वत:च्या घरात रुपिंदरची हत्या केली होती. हत्येनंतर मृतदेह जाळत त्याचे अवशेष पोत्यांमध्ये भरून नाल्यात फेकण्यात आले होते.
Comments are closed.