राहुल गांधींनी पुन्हा आयोगावर हल्ला केला

सादरीकरणाद्वारे मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा : निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी ‘मत चोरी’ या विषयावर दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर हल्लाबोल चढवला. यापूर्वी त्यांनी 7 ऑगस्ट रोजी माध्यमांशी संवाद साधला होता. गुरुवारच्या 31 मिनिटांच्या सादरीकरणात राहुल यांनी मतचोरीचे आरोप करत आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा केला. तथापि, निवडणूक आयोगाने राहुल यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्ट करत फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोग जाणूनबुजून काँग्रेस मतदारांना लक्ष्य करत त्यांची नावे वगळत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. यावेळी त्यांनी कर्नाटकातील ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत त्यांनाही सोबत आणले. महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही असेच घडत असून भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे भारतीय लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस मुख्यालय, इंदिरा भवन येथे पत्रकार परिषदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मतदार यादीतील घोळासंबंधीचे काही पुरावे सादर केले. आजचे खुलासे हे देशातील तरुणांना निवडणुकीत कसा गोंधळ घातला जात आहे हे दाखविण्यासाठी आणखी एक मैलाचा दगड असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर ‘मत चोरांना’ आणि लोकशाही नष्ट करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. कर्नाटक विधानसभा मतदारसंघातील आकडेवारीचा हवाला देत त्यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेस समर्थकांची मते पद्धतशीरपणे डिलीट केली जात आहेत. निवडणूक आयोगाने हे थांबवावे आणि कर्नाटक सीआयडीने मतदार यादीतून डिलीट करण्याच्या चौकशीत मागितलेली माहिती एका आठवड्याच्या आत द्यावी, अशी मागणी केली. राहुल गांधी यांनी 2023 मध्ये कर्नाटकातील आळंद मतदारसंघातून मते हटवण्याच्या कथित प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाचाही उल्लेख केला. येथे स्वयंचलित सॉफ्टवेअर वापरून मतदारांना फसवणूक करून जोडल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रांना उत्तर का नाही?

कर्नाटकात या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कर्नाटक सीआयडीने 18 महिन्यांत निवडणूक आयोगाला 18 पत्रे पाठवली आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला काही अगदी सोप्या तथ्यांची मागणी केली आहे. प्रथम, हे फॉर्म कोणत्या डेस्टिनेशन आयपीवरून भरले गेले ते सांगा. दुसरे, हे अर्ज कोणत्या डिव्हाइस डेस्टिनेशन पोर्टवरून सबमिट केले गेले ते सांगा. आणि तिसरे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आम्हाला ओटीपी ट्रेल्स सांगा, कारण जेव्हा तुम्ही अर्ज दाखल करता तेव्हा तुम्हाला ओटीपी मिळणे आवश्यक असते. कर्नाटक सीआयडीने गेल्या 18 महिन्यांत निवडणूक आयोगाला 18 वेळा यासाठी पत्र लिहिले आहे. मात्र, पत्रोत्तर मिळालेले नाही. निवडणूक आयोग उत्तरे का देत नाही? असा प्रश्नही याप्रसंगी उपस्थित करण्यात आला.

कित्येक मतदारांना पद्धतशीरपणे हटविले

कोणीतरी संपूर्ण भारतातील लाखो मतदारांना पद्धतशीरपणे हटवण्यासाठी लक्ष्य करत आहे. मी विरोधी पक्षाचा नेता आहे आणि 100 टक्के पुराव्याशिवाय मी काहीही बोलणार नाही, असे ते म्हणाले. कर्नाटकातील आळंदमध्ये कोणीतरी 6,018 मते हटवण्याचा प्रयत्न केला आणि तो चुकून पकडला गेला. त्यांनी आरोप केला की काँग्रेस मतदारांची नावे पद्धतशीरपणे हटवली जात आहेत. निवडणूक आयोगाला माहित आहे की हे सर्व कोण करत आहे, असा थेट आरोपही राहुल गांधींनी केला.

‘ऑनलाईन नावे हटवता येत नाहीत; सर्व आरोप निराधार’ : निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना उत्तर

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांना भारतीय निवडणूक आयोगाने खोटे आणि निराधार म्हटले आहे. निवडणूक आयोगाने हे आरोप स्पष्टपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही नागरिकाकडून कोणतेही मत ऑनलाईन हटवले जाऊ शकत नाही, असेही आयोगाने जोर देऊन सांगितले. भारतीय निवडणूक आयोगानेही ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधींच्या आरोपांचे खंडन केले. निवडणूक आयोगाने लिहिले की, ‘लोकसभेचे नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. राहुल गांधी यांनी चुकीचे सादरीकरण केल्यामुळे जनतेद्वारे कोणतेही मत ऑनलाईन हटवता येत नाही. प्रभावित व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणताही बदल किंवा वगळता येत नाही.’ 2023 मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदारांना वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वत: एफआयआर दाखल केला होता. नोंदींनुसार, आळंद विधानसभा मतदारसंघ 2018 मध्ये सुभद गुट्टेदार (भाजप) आणि 2023 मध्ये बी. आर. पाटील (काँग्रेस) यांनी जिंकला होता.

निवडणूक आयोग जाणूनबुजून काँग्रेस मतदारांना लक्ष्य करत त्यांची नावे वगळत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत.

– राहुल गांधी, काँग्रेस नेते

कोणताही सामान्य नागरिक कोणाचेही नाव ऑनलाईन डिलीट करू शकत नाही. मतदाराचे नाव डिलीट करण्यापूर्वी आयोगाकडून संबंधित व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते.

– निवडणूक आयोग

Comments are closed.