सर्व उपासनेवर लाऊडस्पीकर बंद करा.

माजी न्यायाधीश रोहिंटन नरिमन यांच्याकडून प्रश्न उपस्थित

वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रोहिंटन नरिमन यांनी देशभरातील धार्मिक संस्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकांवर बंदी घालण्याचे आवाहन पेले आहे. कुठल्याही धार्मिकस्थळी ध्वनिक्षेपकाच्या वापरावर पूर्ण बंदी घातली जावी, कारण ते सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचवित आहे. जर यावर बंदी घालण्यात आली नाही तर हे मोठ्या प्रमाणात जनआरोग्याला प्रभावित करू शकते असा इशारा त्यांनी दिला आहे. ध्वनिक्षेपक नागरिकांच्या आरोग्य आणि शांततापूर्ण जीवनाच्या अधिकाराचे उल्लंघन करत आहेत.

तर पक्षपाताच्या आरोपांपासून वाचण्यासाठी सर्व धर्मांमध्ये समान स्वरुपात यावर अंकुश लावला जावा असे नरीमन यांनी तिरुअनंतपुरम येथील प्रेस क्लबमध्ये के.एम. बशीर. स्मृति व्याख्यानमालेला संबोधित करत म्हटले आहे. सद्यकाळात देवालाच बहिरे करत असल्याचे मला वाटते. एखाद्या मशिदीचा ध्वनिक्षेपक मोठा आवाज करत असेल, तर एखाद्याच्या मंदिरात घंटा जोरजोरात वाजविली जातेय. हे सर्व बंद व्हायला हवे, कारण यामुळे ध्वनिप्रदूषण होते अशी भूमिका नरिमन यांनी मांडली आहे.

सर्व राज्यांना आवाहन

ध्वनिक्षेपकांमुळे ध्वनिप्रदूषण होत असेल तर हे थेट आरोग्याच्या कक्षेत येते आणि माझ्या मतानुसार प्रत्येक राज्याने लवकरात लवकर प्रार्थनास्थळांध्ये ध्वनिक्षेपकाच्या वापरावर बंदी घालावी, जेणेकरून सकाळी लोकांना त्रास होऊ नये. राज्यांनी हा नियम सर्वांवर समान स्वरुपात लागू करावा, मग कुणी पक्षपाताचा आरोप करू शकणार नाही. सभागृहात ध्वनिक्षेपक लावून कुणाला ऐकण्याची सोय करू शकता, परंतु बाहेर ध्वनिक्षेपक लावून गोंगाट आणि उपद्रव करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा उल्लेख

नरिमन यांनी राज्यघटनेची प्रस्तावना ‘आम्ही भारताचे लोक’ अशी सुरू होत असल्याचे सांगत यात प्रत्येक नागरिक सामील आहे, केवळ बहुसंख्याक किंवा एखादा समुदाय नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही भारताचे लोक याचा अर्थ भारताचे बहुसंख्याक किंवा भारताची प्रौढ पुरुष लोकसंख्या होत नाही. याचा अर्थ आम्ही सर्व भारताचे लोक आहोत, असे उद्गार नरिमन यांनी काढले आहेत.

Comments are closed.