14 उत्तराखंड-चामोली मधील क्लाउडबर्स्टमध्ये गहाळ

मसूरीमध्ये अडकले 2,500 पर्यटक : हिमाचलमध्ये आतापर्यंत 419 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था/नवी दिल्ली, देहराडून

उत्तराखंडमध्ये दोन दिवसांत दुसऱ्यांदा ढगफुटी झाली आहे. 17 सप्टेंबरच्या रात्री चमोली जिह्यातील नंदनगर घाटात ढगफुटी झाली. या आपत्तीमध्ये कुंत्री लंगाफली वॉर्डमधील सहा घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यात 14 लोक बेपत्ता असून 20 जण जखमी झाले आहेत. मदत व बचावकार्यादरम्यान दोघांना वाचवण्यात आले आहे. यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी देहराडूनमध्ये ढगफुटी झाली होती. सततच्या पावसामुळे देहराडून ते मसूरी हा 35 किलोमीटरचा रस्ता अनेक ठिकाणी खराब झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून मसूरीमध्ये 2,500 पर्यटक अडकले आहेत.

उत्तरेकडील राज्यांमध्ये यंदाच्या हंगामात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक राज्यांना भूस्खलन, पूर अशा आपत्तींचा मोठा फटका बसला आहे. पाऊस, पूर, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे हिमाचल प्रदेशमध्ये 419 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने पुढील 48 तासांसाठी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांना हाय अलर्टवर ठेवले आहे. यावर्षी 24 मे रोजी नैर्त्रुत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला. देशात (17 सप्टेंबरपर्यंत सामान्यपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस पडला आहे. राजस्थान (पश्चिम), पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमधून मान्सून आधीच माघार घेऊ लागला आहे, परंतु तो माघारी परतनान अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभाग आणि जागतिक अंदाज प्रणालीनुसार, सप्टेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला एक मोठा कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने मुसळधार पाऊस पाडण्याची अपेक्षा आहे. 25 आणि 26 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात एक मोठी मान्सून प्रणाली तयार होत आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. काही भागात 3 इंचांपर्यंत पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाने अंदमान आणि निकोबार बेटे, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि उत्तराखंडमधील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हिमाचल प्रदेशात 4,596 कोटींचे नुकसान

हिमाचल प्रदेशात पाऊस आणि पूर संबंधित विविध घटनांमध्ये आतापर्यंत सुमारे 4,596 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तसेच 1,500 हून अधिक काँक्रीट आणि 3,800 कच्च्या घरांचे अंशत: किंवा पूर्णपणे नुकसान झाले आहे.

वैष्णोदेवी यात्रेत अडथळ्यांचे सत्र

माता वैष्णोदेवी यात्रा गुरुवारी सकाळी पुन्हा सुरू झाली. तब्बल 22 दिवसांच्या खंडानंतर बुधवारपासूनच सुरू झालेली यात्रा सायंकाळीच खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. यापूर्वी, त्रिकुटा टेकड्यांमध्ये भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे 22 दिवसांसाठी तीर्थयात्रा थांबवण्यात आली होती. बुधवारी तीर्थयात्रा पुन्हा सुरू झाली होती, परंतु खराब हवामानामुळे संध्याकाळी पुन्हा थांबविण्यात आली. आता, हवामान सुधारत असल्याने श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने तीर्थयात्रा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

Comments are closed.