ऑगस्टमध्ये निर्यातीत 16.3 टक्के घसरण, ट्रम्प यांच्या टॅरिफचा जबरा फटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 50 टक्के टॅरिफचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या निर्यातीवर झाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात निर्यातीत मोठी घसरण दिसून येतेय. जेम्स, ज्वेलरी, लेदर उद्योगाला मोठा फटका बसलाय. या उद्योगाची 30 ते 60 टक्के निर्यात एकट्या अमेरिकेवर अवलंबून आहे.

ग्लोबल ट्रेड अँड रिसर्च इनिशिएटिव्हचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांच्या मते अमेरिकेच्या ज्यादा टॅरिफने काही सेक्टर खूप प्रभावित झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावले. त्यामुळे जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यातील हिंदुस्थानच्या निर्यातीत 16.3 टक्क्यांची घसरण होऊन ती 6.7 अब्ज डॉलर झाली. 2025 सालातील ही सर्वात मोठी घट आहे. हिंदुस्थानातून अमेरिकेला केलेल्या निर्यातीत जुलै महिन्यात जूनच्या तुलनेत सुमारे 3.6 टक्के घसरण झाली. ही घसरण 8 अब्ज डॉलर होती. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये 5.7 टक्के निर्यात घट झाली. म्हणजे साधारण 8.3 अब्ज डॉलर निर्यात व्यवहार झाला.

रत्न आणि दागिने – या क्षेत्राची 40 ते 50 टक्के निर्यात एकट्या अमेरिकेत होते. अमेरिकेने टॅरिफ वाढवल्यानंतर रत्न आणि दागिन्यांच्या ऑर्डर्स कमालीच्या खाली आल्या आहेत.

चामड्याचा माल – या उद्योगाचा अमेरिका सर्वात मोठी खरेदीदार आहे. टॅरिफनंतर हिंदुस्थानातील लेदर कंपन्यांच्या ऑर्डर व्हिएतनाम आणि बांगलादेशाकडे वळल्या आहेत.

Comments are closed.