Latur news – पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या CISF जवानासह तिघांचे मृतदेह सापडले; कुटुंबियांनी फोडला हंबरडा

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. जळकोट तालुक्यातील तिरुका येथील सुदर्शन माधव घोणशेट्टे (वय – 27) हा तरुण तिरू नदीत वाहून गेला, तर मौजे पाटोदा-माळहिप्परगा मार्गावरील नाल्यावरून जाताना ऑटो रिक्षा प्रवाहात वाहून गेली. या रिक्षासोबत वैभव पुंडलिक गायकवाड (वय – 24, रा. नरसिंहवाडी, ता. उदगीर) आणि सीआयएसएफ जवान शान मुरहरी सूर्यवंशी (वय – 32) हे देखील वाहून गेले होते. या गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तिघांचाही मृतदेह शोध पथकाला सापडला आहे. तिघांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले तेव्हा कुटुंबियांनी फोडलेल्या हंबरड्याने बचाव पथकाचेही डोळे पाणावले.

सुदर्शन घोणशेट्टे हा तरुण शेताकडे गेलेला असताना तिरू नदीत वाहून गेला होता. तर रात्री आठ वाजता एका पुलावरून रिक्षासह पाच जण वाहून गेले होते. यातील राकेश वाघमारे आणि रिक्षाचलक पोहून पुराच्या पाण्यातून बाहेर आले होते. तर विठ्ठल गवळे एका झाडाला पकडून बसल्याने बचाव पथकाने त्यांना वाचवले. तर सुदर्शन घोणशेट्टेसह रिक्षातील दोघे बेपत्ता होते. बचाव पथकामार्फत त्यांचा शोध सुरू होता.

गुरुवारी सकाळी वैभव गायकवाड यांचा मृतदेह तलावामध्ये सापडला, तर सुदर्शन घोणशेट्टे यांचा मृतदेह तिरुका येथील पांडुचुला जवळ नदी पात्रात सापडला. सायंकाळी सीआयएसएफ जवानानाही मृतदेह मिळून आला. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल व उदगीर, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, ग्राम पंचायत, स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने तीन दिवस बचाव व शोध मोहीम राबविण्यात आली. तिघांचे मृतदेह कुटुंबियांनी सोपवण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. त्यामुळे वातावरण सुन्न झाले.

Comments are closed.