कर्नाटकातील धर्मस्थळ प्रकरणात नवा ट्विस्ट: एसआयटीला आतापर्यंत ‘7 मानवी कवट्या’ सापडल्या; आत्महत

कर्नाटक: कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ धर्मस्थळ (Dharmasthala mass burial case) येथे गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या खून, बलात्कार आणि बेकायदेशीर दफनाच्या कथित प्रकरणांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) आणखी एक महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. धर्मस्थळ हे पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेले असून श्री मंजुनाथेश्वर मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. मात्र, या परिसराशी संबंधित बेकायदेशीर दफनविधी आणि गुन्ह्यांचे प्रकरण समोर आल्यानंतर स्थानिक आणि धार्मिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) गुरुवारी आणखी दोन कवट्या सापडल्या. यामुळे आतापर्यंत सात मानवी कवट्या जप्त झाल्या आहेत.(Dharmasthala mass burial case)

या कवट्या मुख्यत्वे मध्यम वयाच्या पुरुषांच्या असल्याचे सांगितले जात असून अवशेष जवळपास वर्षभर जुने असू शकतात. फॉरेन्सिक तपासातून याची खात्री होणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे अवशेष आत्महत्येच्या घटनांशी संबंधित असू शकतात. सध्या एसआयटी धर्मस्थळ येथे शेकडो लोकांच्या हत्या व बेकायदेशीर दफन प्रकरणाची चौकशी करत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बुधवारी एसआयटीने पाच कवट्या जप्त केल्या होत्या, तर गुरुवारी आणखी दोन सापडल्या. अँटी-नक्सल फोर्सच्या जवानांसह पोलिस व वन विभागाच्या संयुक्त पथकाने जवळपास 12 एकर जंगल परिसर पिंजून काढला. शोधमोहीमे दरम्यान इतर काही मानवी अवशेषांसोबतच एक लाठीही मिळाली. एसआयटी सूत्रांच्या माहितीनुसार, हे शोध बंगलगुद्दा रिझर्व्ह फॉरेस्टच्या दाट भागात लावण्यात आले, जिथे याआधीही संशयास्पद हालचालींच्या तक्रारी होत्या.

सनसनाटी आरोपांमुळे चौकशीला सुरुवात
धर्मस्थळ सामूहिक दफन प्रकरण जुलै 2025 मध्ये प्रकाशात आले, जेव्हा एका माजी सफाई कामगाराने दावा केला की 1995 ते 2014 या काळात त्याला मंदिर शहराजवळ 100 हून अधिक मृतदेह दफन करण्यास भाग पाडले गेले होते. तक्रारदाराचे नाव सी.एन. चिन्नय्या असे असून त्याने आरोप केला की हे मृतदेह मुख्यत्वे महिलांचे व अल्पवयीनांचे होते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचारांचे चिन्ह होते. चिन्नय्याने न्यायालयात काही सांगाड्यांचे अवशेषही सादर केले होते.

यानंतर कर्नाटक सरकारने 19 जुलै रोजी डीजीपी प्रणब मोहंती यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली. तपासादरम्यान 17 ठिकाणी उत्खनन करण्यात आले; मात्र बहुतेक ठिकाणी महत्त्वाचे अवशेष मिळाले नाहीत. ऑगस्ट महिन्यात चिन्नय्याला खोटी साक्ष दिल्याच्या आरोपाखाली अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यानंतर आणखी एका महिलेने तिची मुलगी हरविल्याचा दावा मागे घेतला, जो काल्पनिक असल्याचे स्पष्ट झाले.

चिन्नय्याची न्यायालयीन हजेरी व हायकोर्टाचे निर्देश

गुरुवारी चिन्नय्याला बेलथंगडी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याचे जबाब नोंदवले गेले. पुढील सुनावणीसाठी तो 23 सप्टेंबर रोजी पुन्हा हजर राहणार आहे. दरम्यान, कर्नाटक हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना निर्देश दिले की धर्मस्थळातील कथित दफनांबाबत स्वतंत्र माहिती असल्यास ती नोंदवावी. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी सुनावणी 26 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

एसआयटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “या कवट्या ताज्या वाटत आहेत व त्या पुरुषांच्या आहेत. फॉरेन्सिक तपासातून मृत्यूचे कारण व कालावधी स्पष्ट होईल. आम्ही आत्महत्या किंवा नैसर्गिक कारणांची शक्यता तपासत आहोत.” या प्रकरणावर राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने काँग्रेस सरकारवर मंदिर शहराची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला आहे, तर काँग्रेसने हे एक राजकीय कट असल्याचे म्हटले आहे.

हे संपूर्ण प्रकरण कसे उघडकीस आले?

माजी स्वच्छता कर्मचाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये त्याने असा दावा केला होता की मोठ्या लोकांच्या दबावाखाली त्याला अनेक मृतदेह दफन करण्यास भाग पाडले गेले. त्याने सांगितले की अनेक मृतदेहांवर लैंगिक हिंसाचार आणि हत्येच्या खुणा होत्या, त्यापैकी बहुतेक महिला आणि अल्पवयीन मुली होत्या, अशी माहितीही त्याने दिली होती. त्याने 13 संशयित दफनस्थळे ओळखली, त्यापैकी बहुतेक नेत्रावती नदीच्या काठावर होती.

तक्रारदाराने 3 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती आणि 4 जुलै रोजी धर्मस्थळ पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 211(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने त्याच्या सुरक्षेसाठी साक्षीदार संरक्षण कायदा, 2018 अंतर्गत संरक्षण मागितले होते, जे 10 जुलै रोजी मंजूर करण्यात आले. त्यानंतर, 19 जुलै रोजी डीजीपी प्रणव मोहंती यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय? (Karnataka Mass Burial Case)

1995 ते 2014 पर्यंत धर्मस्थळ परिसरात सदर सफाई कामगार म्हणून काम करत होता. या काळात त्याला अनेक क्रूर हत्या केल्यानंतर मृतदेह दफन करण्यास भाग पाडण्यात आले. सफाई कामगाराने त्याच्या जबाबात असेही म्हटले आहे की पुरलेल्यांमध्ये 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि शारीरिक आणि मानसिक छळ झालेल्या अनेक मुली होत्या. मी नग्न अवस्थेतील अनेक महिलांचे मृतदेह पाहिले, असंही हा सफाई कर्मचारी म्हणाला. सफाई कर्मचाऱ्यानं मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवताना फोटो आणि पुरावेदेखील दिले.

आणखी वाचा

Comments are closed.