Asia Cup: आशिया कप सुपर-4 मध्ये भारताचे सामने कधी, कोणत्या संघाविरुद्ध? जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक
आशिया कप 2025 (Asia Cup 2025च्या सुपर-4 मधील चारही संघांची नावे जाहीर झाली आहेत. भारत हा सुपर-4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्यानंतर पाकिस्तानने क्वालिफाय केले. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यानंतर गट-ब मधील संघ निश्चित झाले, ज्यात श्रीलंका आणि बांगलादेश सुपर-4 मध्ये प्रवेश करणारे संघ ठरले. आता भारताचा सुपर-4 मधील सामना कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध होणार आहे, ते पाहूया.
आशिया कपमधील सुपर-4 सामने शनिवार, 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. भारताचा सुपर-4 मधील पहिला सामना रविवार, 21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल. त्यानंतर बुधवार, 24 सप्टेंबरला भारताची बांगलादेशशी भिडंत होणार आहे. भारताचा सुपर-4 मधील शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध शुक्रवार, 26 सप्टेंबरला खेळवला जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील.
भारत विरुद्ध पाकिस्तान – रविवार, 21 सप्टेंबर, दुबई
भारत विरुद्ध बांगलादेश – बुधवार, 24 सप्टेंबर, दुबई
भारत विरुद्ध श्रीलंका – शुक्रवार, 26 सप्टेंबर, दुबई
भारताला आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 3 पैकी किमान 2 सामने जिंकणे आवश्यक आहे. आज शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी भारताचा ओमानविरुद्ध (IND vs OMAN) लीग स्टेजमधील शेवटचा सामना आहे. भारताने याआधीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात यूएईला 9 विकेट्सनी पराभूत केलं, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर 7 विकेट्सनी मात केली. त्यामुळे भारत हा आशिया कप 2025 मधील सर्वात मजबूत संघ मानला जात आहे. अशा स्थितीत टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचेल, अशी आशा आहे.
आशिया कप 2025 चा अंतिम सामना रविवार, 28 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. यावेळी आशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये होत आहे आणि भारत ICC टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत क्रमांक 1 स्थानी आहे. फक्त आशियातच नव्हे तर जगभरात भारत हा टी20 क्रिकेटमधील नंबर-1 संघ आहे. त्यामुळे सगळं काही टीम इंडियाच्या (Team india) बाजूने गेलं, तर भारताचं अंतिम फेरीतलं स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे.
Comments are closed.