हँडशेक वादानंतर आता आशियन क्रिकेट कौन्सिलचा मोठा निर्णय, कडक निर्देश जाहीर

आशिया कप 2025 (Asia Cup) फक्त क्रिकेटच्या वर्तुळातच नाही तर संपूर्ण जगभर चर्चेचा विषय ठरला आहे.भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 14 सप्टेंबरला सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन (हँडशेक) करण्यास नकार दिला, आणि त्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला. पाकिस्तानने याबाबत आयसीसीकडे तक्रार केली होती तसेच सामन्याचे रेफरी अँडी पायकॉफ्ट (Andy Pycroft) यांना आशिया कपमधून हटवण्याची मागणीही केली होती. मात्र आयसीसीने पाकिस्तानची ही मागणी फेटाळली. आता आशियन क्रिकेट कौन्सिलने (ACC) हँडशेक वादानंतर कठोर पावले उचलली आहेत.

सामन्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पत्रकारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पत्रकार परिषदेत (प्रेस कॉन्फरन्स) राजकीय प्रश्न विचारण्यास मनाई करण्यात आली आहे. भारत आणि ओमान (IND vs OMAN) यांच्यातील सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. 18 सप्टेंबरला कुलदीप यादवने (Kuldeep yadav) भारतीय संघाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत एसीसीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना स्पष्ट सांगितले की, राजकीय प्रश्न विचारू नयेत.

पाकिस्तानने हँडशेक वादानंतर आशिया कप 2025 मधून माघार घेण्याची धमकी दिली होती. यूएईविरुद्धच्या सामन्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तानी संघाने पत्रकार परिषद घ्यायची होती, मात्र त्यांनी ती रद्द केली. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानने पत्रकार परिषद रद्द केल्यानंतर आयसीसीने नाराजी व्यक्त केली. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान सरावासाठी मैदानावर उपस्थित होता, मग पत्रकार परिषद कशी रद्द करू शकतो? जर संसर्गजन्य आजार असेल किंवा कोणत्यातरी दु:खद प्रसंगामुळे संघ शोकात असेल, तर ते समजण्यासारखे आहे. पण पाकिस्तानने पत्रकार परिषदेला हजेरी का लावली नाही?

भारत–पाकिस्तान सामन्यात अँडी पायकॉफ्ट हे रेफरी होते. त्यांनीच सलमान अली आगाला हा संदेश दिला होता की, भारतीय संघ पाकिस्तानी संघासोबत हस्तांदोलन करू इच्छित नाही. यावरून पाकिस्तानने अँडी पायकॉफ्ट यांना आशिया कपमधून हटवण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. पण आयसीसीने ती मागणी नाकारली. त्यानंतर यूएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानने हा सामना बहिष्कृत (बॉयकॉट) केला. मात्र आयसीसीच्या हस्तक्षेपानंतर सामना ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल एक तास उशिरा सुरू झाला.

Comments are closed.