विरोधात बातम्या देणारी चॅनल्स बंद होऊ शकतात! ट्रम्प याची उघड धमकी

एबीसी नेटवर्कचे जिमी किमेल यांनी ट्रम्प यांचा राईट हॅण्ड कर्क यांच्या हत्येमागे सत्ताधारी रिपब्लिकनचाच हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर एबीसी नेटवर्कने जिमी किमेल यांना निलंबित केले.
सरकारविरोधात बातम्या देणाऱ्या माध्यमांची गळचेपी करण्याचे प्रयत्न हिंदुस्थानसह अनेक देशांमध्ये सुरू असतात. मात्र, आता महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वृत्तवाहिन्यांना थेट धमकीच दिली आहे. माझ्याविरोधात बातम्या देणाऱया चॅनेल्सचे परवाने काढून घेतले जाऊ शकतात. ते चॅनेल्स बंद होऊ शकतात, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
वॉल्ट डिस्ने कंपनीच्या एबीसी नेटवर्क चॅनेलवरील प्रसिद्ध होस्ट जिमी किमेल याच्या कार्यक्रमावरून अमेरिकेत वादंग निर्माण झाले आहे. किमेलने त्याच्या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा उजवा हात मानले जाणारे 31 वर्षीय तरूण नेते चार्ली कर्क यांच्या हत्येबाबत प्रश्न उपस्थितीत करीत मोठे विधान केले होते. कर्क यांच्या हत्येला डाव्या विचारसरणीचे समर्थक जबाबदार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, एबीसी नेटवर्कचे जिमी किमेल यांनी कर्क यांच्या हत्येमागे सत्ताधारी रिपब्लिकनचाच हात असल्याचा आरोप केला. यामुळे खळबळ उडाली. अखेर एबीसी नेटवर्कने जिमी किमेलला निलंबित केले. अमेरिकेत गुरुवारी या घडामोडी घडल्या तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ब्रिटनच्या दौऱयावर होते. ब्रिटनवरून परतत असताना विमानात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना किमेलचे चॅनेलमधून झालेले निलंबन योग्य असल्याचे सांगताना धमकी दिली आहे.
97 टक्के चॅनेल विरोधात तरीही जिंकलो
माझ्या विरोधात 97 टक्के चॅनेल्स होते तरीही गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत मी सहज जिंकलो. जे चॅनेल्स माझ्या विरोधात, माझ्या सरकार विरोधात नकारात्मक बातम्या दाखवतात त्यांचा परवाना काढून घेतला जाऊ शकतो, अशी धमकी ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
‘एफसीसी’चीही धमकी
अमेरिकेची प्रसारण नियामक संस्था फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे (एफसीसी) अध्यक्ष बेंडल कार यांनीही धमकी दिली आहे. किमेलचे निलंबन ही तर सुरुवात आहे. सार्वजनिक हितासाठी चॅनेल्सला जबाबदार धरत राहू. जर त्यांना हे मान्य नसेल तर त्यांनी परवाने एफसीसीकडे परत करावेत असे बेंडल कार यांनी म्हटले आहे.
हल्लेखोर ‘मागा’ गँगचा
ट्रम्प यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (मागा) ही घोषणा दिली होती. या घोषणेनंतर अनेक तरुण ट्रम्प यांच्या मागे उभे राहिले. कर्क यांच्या हत्येमागे ही मागा गँग असल्याचा संशय किमेल यांनी व्यक्त केला. त्याचवेळी हे सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही किमेल यांनी केला.
Comments are closed.