तो दिवस माझा नव्हता; पण सचिनचा खेळ अभिमानास्पद

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळे हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा निराश झाला. मात्र, त्याच स्पर्धेत चौथ्या स्थानावर थोडक्यात पदक गमावणाऱया उदयोन्मुख खेळाडू सचिन यादवच्या दमदार कामगिरीचे त्याने भरभरून कौतुक केले.
चार वर्षांपूर्वी टोकियोत इतिहास रचणाऱया नीरजला त्या कामगिरीची गुरुवारी पुनरावृत्ती करता आली नाही. अपयशामुळे नीरज हताश तर झालाच होता, पण त्याने आपल्या अपयशापेक्षा सचिन यादवचे कौतुक करण्याला अधिक प्राधान्य दिले. याबाबत नीरज सोशल मीडियावर व्यक्त झाला. त्या पोस्टमध्ये तो म्हणाला, ‘हंगामाचा शेवट असा होईल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. पाठीच्या दुखापतीशी झगडत असूनही मी देशासाठी सर्वोत्तम कामगिरी देण्याचा प्रयत्न केला, पण तो दिवस माझा नव्हता. तरीही हिंदुस्थानच्या सचिनने जे प्रदर्शन केले ते अभिमानास्पद आहे. तो पदकाच्या अगदी जवळ पोहोचला. त्याची ही कामगिरी सर्वांचे लक्ष वेधणारी आहे.’
पाठीच्या दुखापतीशी झुंज देत नीरजची निराशा
गतविजेता नीरज मात्र अंतिम फेरीत चमक दाखवू शकला नाही. टोकियोत झालेल्या स्पर्धेत त्याने फक्त 84.03 मीटरची फेक केली आणि पाचव्या फेरीनंतर बाहेर पडला. संपूर्ण स्पर्धेत त्याला पाठीच्या दुखण्याचा त्रास होत होता. या अपयशानंतर तो आपल्या चाहत्यांना म्हणाला, ‘मी तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभारी आहे. ही दुखापत लवकरच मागे सारून मी जोरदार पुनरागमन करीन. तुमच्या पाठिंब्यामुळेच मला ही प्रेरणा मिळते.’
सचिन यादवचा चौथा क्रमांक
गुरुवारी झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सचिन यादवने 86.27 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह चौथे स्थान पटकावले. त्याने चार वेळा 85 मीटरहून अधिक अंतर पार करत सातत्य दाखवले. सोशल मीडियावर नीरजने सचिनच्या या कामगिरीचे कौतुक करत ‘त्याचे पदक जवळपास निश्चित होतं, पण थोडक्यात हुकले; तरी त्याची कामगिरी प्रेरणादायी आहे,’ असे म्हटले.
Comments are closed.