भाजपचे स्वातंत्र्यवीरांवरील प्रेम बेगडी, भगूरच्या सावरकर उद्यानाचे नाव; ‘नमो उद्यान’ करण्याचा घाट!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकजवळील भगूर येथील सावरकर उद्यानाचे ‘नमो उद्यान’ असे नामकरण करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. उद्यानाच्या अपूर्ण कामाला नमो उद्यान अंतर्गत निधी देऊन सावरकारांचे नाव हटविण्याच्या या कृतीमुळे भाजपचे स्वातंत्र्यवीरांवरील बेगडी प्रेम उघड झाले आहे.
सावरकर उद्यानाचे काम गेल्या 24 वर्षांपासून रखडले आहे. 15 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्यावरही उद्यानाचे काम अपूर्णावस्थेत आहे. या उद्यानाच्या कामासाठी राज्य सरकारच्या नमो उद्यान योजने अंतर्गत आणखी 1 कोटी रुपये निधी देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाऐवजी ‘नमो उद्यान’ म्हणून ते विकसित करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱयांकडून केले जात आहेत. यामुळे भगूरमधील सावरकर प्रेमींबरोबर सर्वसामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
सावरकरप्रेमींच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार
भगूरमध्ये सावरकरांच्या नावे विकसित करण्यात येणाऱया उद्यानाचे काम प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि राजकीय हस्तक्षेपामुळे रखडले आहे. या कामावर कोटय़वधी निधी खर्च होऊनही राजकीय अनास्थेपोटी हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यात आता नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त सुरू करण्यात येणाऱ्या नमो उद्यान योजने अंतर्गत एक कोटी निधीच्या बदल्यात उद्यानाच्या नावातून सावरकरांचे नाव हटवून सावरकरप्रेमींच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे.
उद्यानाच्या नामांतरास शिवसेनेचा विरोध
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर उद्यानाचे ‘नमो उद्यान’ असे नामकरण करण्यास शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. भगूरकर जनता कोणत्याही परिस्थितीत उद्यानाचे नामांतर सहन करणार नाही. सत्ताधाऱयांचा हा डाव हाणून पाडू, असा इशारा भगूर शहरप्रमुख काकासाहेब देशमुख यांनी दिला. भगूरमध्ये येणारे पर्यटक आणि येथील नागरिकांसाठी उद्यानाची आवश्यकता आहे. मात्र सावरकर यांच्या नावानेच हे उद्यान पूर्णत्वास न्यायला हवे, अशी सर्वांची भावना आहे. उद्यानाचे नाव बदलणार असाल तर सरकारने दिलेला निधी परत घ्यावा, असे देशमुख म्हणाले.
Comments are closed.