हिंदुस्थानी जेन-झींची आयफोनसाठी दंगल, बीकेसीतील अॅपल शोरूमबाहेर रेटारेटी, धक्काबुक्की आणि हाणामारी
नेपाळमधील जेन-झी भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीविरोधात रस्त्यावर उतरून न्याय्य-हक्कांसाठी लढत असताना हिंदुस्थानातील जेन-झींनी आज आयफोनसाठी दंगल केली. आयफोन-17 च्या खरेदीसाठी दिल्ली, मुंबईत मध्यरात्रीपासूनच रांगा लागल्या. मुंबईत बीकेसीतील शोरूमबाहेर तर तुफान रेटारेटी, धक्काबुक्की आणि फ्रीस्टाईल हाणामारी झाली.
अॅपलने 9 सप्टेंबरला लाँच केलेल्या आयफोन 17 सीरीजमधील नवीन आयफोन शुक्रवारपासून उपलब्ध झाले आहेत. पहिल्याच दिवशी या नव्या सीरीजचा आयफोन खरेदी करता यावा, यासाठी बीकेसीतील ऍपल शोरूमबाहेर गुरुवारी मध्यरात्रीपासूनच रांगा लागल्या होत्या. यात तरुणांची संख्या मोठी होती. आयफोन 17 प्रो मॅक्स आणि आयफोन 17 प्रो या फोनसाठी तरुणाईमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून ऍपल स्टोअरबाहेर उभ्या असलेल्या तरुणाईच्या गर्दीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आयफोन 17 सीरीजमध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 मॅक्स आणि आयफोन 17 एअर हे चार फोन लाँच करण्यात आले आहेत. मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि पुणे अशा चारही ऍपल स्टोअरबाहेर आयफोन चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली.
गर्दी नियंत्रणाबाहेर
आयफोन 17 सीरीजचा पहिला फोन मीच खरेदी करणार, हा हट्ट धरून रात्रभर जेन-झी तरुणांनी बीकेसीतील स्टोअरबाहेर रांगा लावल्या. सकाळी स्टोअरबाहेर मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यात रेटारेटी झाल्याने वादाला तोंड फुटले आणि फ्रीस्टाईल हाणामारी झाली. सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केला तसेच पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
किंमत किती?
आयफोन 17 -82,900 रुपये
आयफोन 17 प्रो -1,34,900 रुपये
आयफोन 17 प्रो मॅक्स – 1,49,900 रुपये
आयफोन 17 एअर -1,19,900 रुपये
ऑनलाईन ऑर्डर करा
धक्काबुक्की आणि हाणामारीच्या घटनेने ऍपल स्टोअर व्यवस्थापनाने तातडीने सूचना जारी केल्या. ग्राहकांनी स्टोअरवर गर्दी न करता ऑनलाईन फोन खरेदीचा पर्याय निवडावा असे आवाहन केले आहे.
Comments are closed.