देशात अनागोंदी निर्माण करण्याचा प्रयत्न करा

राहुल गांधी यांच्यावर भाजपने केला गंभीर आरोप

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

राहुल गांधी यांनी केलेल्या ‘मतचोरी’च्या आरोपानंतर आता त्यांची ‘जेन-झेड’ला आव्हान करणारी आणखी एक पोस्ट वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. देशात अराजक माजविण्याचा गांधी यांचा प्रयत्न असून ते विविध समाजघटकांमध्ये गृहयुद्ध छेडण्याची योजना करीत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. ‘मतचोरी’चे बनावट आणि धादांत खोटे आरोप करून गांधी या देशातील तरुणांची माथी भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असाही आरोप होत आहे.

‘या देशातील तरुण देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी आणि ‘मतचोरी’ थांबविण्यासाठी प्रयत्न करतील, त्यांच्या पाठीशी मी उभा राहीन’ अशी पोस्ट राहुल गांधी यांनी प्रसारित केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पलटवार करून त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी होणार, असे प्रतिपादनही केले आहे.

गांधी यांनाच सोडावा लागेल देश

देशात गृहयुद्ध छेडण्यासाठी गांधी यांनी अमेरिकेतील वादग्रस्त उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या फाऊंडेशनशी संधान बांधले आहे. देशातील तरुणांना भ्रमित करण्याचे त्यांचे प्रयत्न असले तरी ते अयशस्वी होतील. या देशातील तरुण राहुल गांधी यांच्या विरोधातच उग्र आंदोलन करतील आणि गांधी तसेच त्यांच्या मित्रपक्षांचे नेते यांच्यावरच देश सोडण्याची वेळ येईल, असे भाकित भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले आहे.

‘नेपाळ’ गांधी यांच्यावरच उलटणार

भारतात नेपाळप्रमाणे सरकार उलथविले जाईल, अशी राहुल गांधी यांची कल्पना असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. नेपाळमध्ये तेथील तरुणांनी घराणेशाहीचे सरकार उलथविले. राहुल गांधी आरोप करण्याआधी नीट माहिती घेत नाहीत. ते सकाळी उठतात आणि त्यावेळी त्यांच्या मनात जे विचार असतील, ते सोशल मीडियावर पोस्ट करून मोकळे होतात. त्यामुळे नंतर त्यांची आणि त्यांच्या पक्षाची कोंडी होते. हे त्यांनी टाळले पाहिजे, अशा अर्थाचा सल्लाही दुबे यांनी त्यांना दिला आहे.

तरुणांनीही काँग्रेसला काढले सत्तेबाहेर

राहुल गांधी तरुणांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, ते हे विसरतात, की याच जेन-झेड तरुणांनी 11 वर्षांपूर्वी काँग्रेसला सत्तेबाहेर काढले आहे. काँग्रेसने सातत्याने तरुणाईचा विश्वासघात केला आहे. नातेवाईकशाही आणि आर्थिक घोटाळे यांच्या माध्यमातून काँग्रेसने गेली 75 वर्षे तरुणांची दिशाभूल केली आहे. ही तरुणाई आजही त्यांना सोडणार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या केरळ शाखेचे प्रमुख राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे.

निवडणूक आयोग नि:पक्षपाती

केंद्रीय निवडणूक आयोग आणि त्याचे देशभरातील अधिकारी त्यांच्या उत्तरदायित्वाचे निर्वहन अत्यंत योग्यप्रकारे, तसेच नि:पक्षपातीपणाने करीत आहेत. गांधी यांच्याजवळ पुरावे असतील, तर ते न्यायालयात का जात नाहीत? न्यायालयात आरोप टिकणार नाहीत, हे त्यांना माहित आहे. त्यामुळे ते पत्रकार परिषदांमध्ये बिनबुडाचे आरोप करतात. हे त्यांचे तंत्र त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.

प्रकरण तापण्याची शक्यता

राहुल गांधी यांची नवी पोस्ट भारतीय जनता पक्षाने गंभीरपणे घेतल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत परिस्थिती हाताबाहेर न जाण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गांधी यांनी न्यायालयात जाऊन आरोप सिद्ध करावेत, असे आवाहनही त्यांना अनेकांनी केले आहे.

Comments are closed.