गारगाई धरणासाठी वाड्याजवळ साडेचार लाख झाडांवर कुऱ्हाड, एक हजार कुटुंबे विस्थापित होणार

 वसंत भोईर

मुंबईची तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेल्या वाडा तालुक्यातील गारगाई धरणाचे काम येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. यासाठी संपूर्ण सर्वेक्षण झाले असून या प्रकल्पासाठी तानसा अभयारण्यासह परिसरातील सुमारे साडेचार लाख झाडांची कत्तल केली जाणार आहे. या धरण प्रकल्पात एक हजाराहून अधिक कुटुंबे विस्थापित होणार आहेत.

पालघर जिल्हय़ात वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गारगाई धरण बांधले जाणार आहे. या प्रकल्पासाठी मुंबई पालिकेचे गेल्या तीन वर्षांपासून सर्वेक्षण सुरू होते. या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर, घोडसाखरे या सहा महसूल गावांसह 12 पाडय़ांचा समावश आहे. मोखाडा तालुक्यातील आमले हे एकमेक गाव विस्थापित होणार आहे.
विस्थापित होणारी कुटुंबे आदिवासी समाजाची आहेत. या सर्कांचे पुनर्वसन करण्यासाठी वाडा तालुक्यातीलच वनविभागाची जागा निश्चित केली आहे. तसेच या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱया खासगी मालकीची जमीन, झाडे व घरांची किंमत बाधितांना देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकल्पासाठी तब्बल साडेचार लाख झाडे तोडली जाणार आहेत. तोडण्यात येणाऱ्या झाडांची ओळख पटावी म्हणून दोन लाख झाडांवर क्रमांक टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

तिप्पट झाडे लावणार
तानसा वन्यजीव अभयारण्यालगत हा प्रकल्प होत आहे. साडेचार लाख झाडे बुडीत क्षेत्रात येत असल्याने आधी या झाडांच्या बदल्यात तीन पटीने अन्य ठिकाणी झाडे लावण्यात आली तरच वनविभाग या प्रकल्पातील झाडे तोडण्यास परवानगी देणार आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने अन्य जिल्ह्यांत जागा खरेदी करून त्या ठिकाणी तिप्पट झाडे लावण्यासाठी नियोजन पूर्ण केले आहे. या प्रकल्पात विस्थापित होणाऱया कुटुंबीयांचे पूर्ण पुनर्वसन केले जाणार असून सद्यस्थितीत असलेल्या त्यांच्या घर, जमीन, फळझाडाची किंमत निश्चित करण्यात आली आहे.

 प्रस्तावित गारगाई धरण 69 मीटर उंचीचे व 972 मीटर लांबीचे आहे.
 धरणाचे पाणी दोन किलोमीटरवर असलेल्या मोडकसागर धरणात बोगद्याद्वारे आणले जाणार आहे.
 गारगाई धरणामुळे मुंबईला दररोज 440 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा होईल.
 प्रकल्पामुळे 1100 हेक्टर जमीन बाधित होणार असून यामधील 700 हेक्टर जमीन तानसा अभयारण्याची आहे.

Comments are closed.