दिव्यांग मुलांची शाळाच झाली ‘विकलांग’, 6 वर्षांनंतरही विद्यालयाच्या इमारतीचे काम अपूर्णच; कोट्यवधींचा चुराडा करूनही विद्यार्थ्यांची फरफट

रायगड जिल्हा परिषदेच्या मूकबधिर शाळेच्या नव्या इमारतीचे काम गेल्या सहा वर्षांपासून लटकले आहे. केवळ तळमजल्याचे काम करून कंत्राटदाराने कानाडोळा केला असून उर्वरित इमारत कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद आणि ठेकेदाराच्या या भोंगळ कारभारामुळे कोट्यवधींचा चुराडा करूनही दिव्यांग मुलांची शाळा ‘विकलांग’ झाल्याने येथील विद्यार्थ्यांची खासगी जागेत फरफट होत आहे.
अलिबाग वरसोली येथे मूकबधिर विद्यालयाची इमारत होती. मात्र ही इमारत जीर्ण झाल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने राजेश मगर या ठेकेदारास शासकीय मूकबधिर विद्यालयच्या नव्या इमारतीच्या कामाचा ठेका ४ जुलै २०२२ रोजी दिला होता. यासाठी ९६ लाख ५४ हजार ६०६ रुपये निधी मंजूर केला असून ठेकेदाराने सहा महिन्यांत काम पूर्ण करून देण्याचे ठरले होते. तळमजल्याच्या वर्ग खोल्या असून पहिल्या मजल्यावर वसतिगृहास मंजुरी मिळणार होती. प्रत्यक्षात ठेकेदाराला तळमजला पूर्ण करण्यास पाच वर्षे कालावधी लागला असून हे कामदेखील अपूर्णावस्थेत आहे.
विद्यानगर येथील शासकीय मूकबधिर विद्यालय ३५ वर्षे जुने होते. जीर्ण झालेल्या इमारतीमुळे त्याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेने स्वनिधीतून दोन कोटी ४६ लाख ८२ हजार रुपयांची तरतूद केली.
३१ गुंठे क्षेत्रात असलेल्या या जागेत एक मजली इमारत बांधली जाणार आहे. २०२१ साली कामाला सुरुवात झाली होती. मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सध्या मूकबधिर शाळा ही भाड्याच्या घरात भरत आहे.
जीर्ण झालेली इमारत पूर्णतः पाडण्यात आली होती. महाविकास आघाडी काळात नवीन इमारत बांधण्यासाठी मंजुरी देऊन निधीही उपलब्ध करून दिला होता. १५ ऑगस्ट २०२१ रोजी नव्या इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला होता.
“मूकबधिर शाळेच्या तळमजला इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीड कोटी निधी मंजूर झाला असून कामाचा ठेकाही देण्यात आलेला आहे. आठवड्याभरात इमारतीचे काम सुरू होईल.”
राहुल देवांग, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद
Comments are closed.