अमेरिकेतील घटनांची गंभीर नोंद
परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते जयस्वाल यांचे प्रतिपादन
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेत पोलिसांकडून झालेल्या भारतीय तंत्रज्ञाच्या एन्काऊंटर प्रकरणाची गंभीर नोंद भारताने घेतली असून मृतकाच्या परिवाराशी आणि अमेरिकेच्या प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. त्यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विविध घटना आणि भारताची प्रतिक्रिया यांच्या संदर्भात व्यक्तव्य केले. भारताने तत्काळ कृती केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेत कॅलिफोर्निया प्रांतात भारताच्या तंत्रज्ञाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. तो तेथे एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला होता. त्याने त्याच्या काही सहचऱ्यांना चाकूने भोसकले होते. त्यामुळे तक्रार मिळाल्यानंतर पोलिस त्याच्या निवासस्थानी पोहचले होते. त्यावेळी तो आणखी एका सहचऱ्यावर हल्ला करण्याच्या पवित्र्यात होता. अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी त्याच्यावर गोळीबार करावा लागला, असे अमेरिकेच्या पोलिसांचे म्हणणे आहे. भारताने या संबंधी माहिती मागविली असून मृत तंत्रज्ञाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. त्यांनाही आवश्यक ते सर्व साहाय्य देण्यात येत आहे. त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी साहाय्य केले जात आहे, अशी माहिती जयस्वाल यांनी या घटनेच्या संदर्भात पत्रकारांना दिली आहे.
जापाड सैन्य कसरती
रशियातील जापाड येथील बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यासात भारतही भाग घेणार आहे. या अभ्यासात अमेरिकेसह नाटो देशांचा सहभाग राहणार आहे. भारतही या सरावात भाग घेणार असून ही सामान्य प्रक्रिया आहे. अशा आंतरराष्ट्रीय स्वरुपाच्या अभ्यासात भारत नेहमी भाग घेतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
कॅनडातील धमक्या
कॅनडामधील भारतीय दूतावासाला आलेल्या शीख दहशतवाद्यांच्या धमक्यांविषयीही त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. उच्चायोगाला सुरक्षा पुरविणे हे यजमान देशांचे कर्तव्य असते. भारताने या संबंधात कॅनडाशी संपर्क केला असून परिस्थिती जाणून घेतली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
नेपाळमधील अंतरिम सरकारचे स्वागत
नेपाळमध्ये सुशिला कार्की यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकारची स्थापना झाली आहे. भारत या सरकारचे स्वागत करत आहे. नेपाळमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य देण्यात भारत सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्की यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आहे. भारताचे नेपाळशी अत्यंत जवळचे संबंध असल्याने तेथील घटनांवर भारत लक्ष ठेवून आहे. कार्की यांच्या नेतृत्वावर भारताचा विश्वास असल्याचेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
चाबहार बंदराचा प्रश्न
इराणमधील चाबहार बंदराचा विकास भारताने आपल्या हाती घेतला आहे. तथापि, या विकासकार्याला अमेरिकेने दिलेली सूट आता त्या देशाने मागे घेतली आहे. यामुळे जी परिस्थिती उदभवली आहे, तिचा बारकाईने अभ्यास करुन भारत पुढचे धोरण ठरविणार आहे, असेही प्रतिपादन त्यांनी या संदर्भात केले.
सौदी अरेबियाशी दृढ संबंध
भारताचे सौदी अरेबियाशी दृढ संबंध असून ते अधिक बळकट करण्याच्या दिशेने प्रयत्न होत आहेत. पाकिस्तानने या देशाशी सामरिक करार केला असला तरी भारताच्या या देशाशी असलेल्या संबंधांवर त्याचा परिणाम होणार नाही. ऊर्जा, पायाभूत सुविधा विकास, व्यापार, आदी क्षेत्रात दोन्ही देश एकत्र कार्य करीत आहेत, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांनी गेल्या काही दिवसात जे गौप्यस्फोट केले आहेत, त्यांच्यामुळे पाकिस्तान प्रशासन आणि तेथील लष्कर यांचे दहशतवाद्यांशी असलेले गाढ संबंध स्पष्ट होतात, अशी टिप्पणी त्यांनी केली.
Comments are closed.