राहुल गांधींचे आरोप निराधार आहेत.
कर्नाटक निवडणूक आयोगाकडून स्थितीवर प्रकाश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, बेंगळूर
कर्नाटक राज्यातील आळंद या विधानसभा मतदारसंघात 6 हजारांहून अधिक मतदारांची नावे काटण्यात आली आहेत, हा राहुल गांधी यांनी गुरुवारी केलेला आरोप निराधार ठरण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. अन्बुकुमार यांनी गुरुवारी रात्री उशिरा या प्रकरणातील स्थिती स्पष्ट केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेही विविध नियम स्पष्ट करत राहुल गांधी यांचे आरोप निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट केले.
कर्नाटकातील आळंद या विधानसभा मतदारसंघात 2023 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘कोणीतरी’ ऑनलाईन पद्धतीने 6 हजारांहून अधिक मतदारांची नावे काटली होती. यापेक्षाही कितीतरी अधिक नावे काटण्याचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यासाठी सॉफ्टवेअरचा उपयोग करण्यात आला होता. ‘कोणीतरी’ पहाटे चार वाजता ही नावे काटली, असेही राहुल गांधी यांचे म्हणणे होते. तसेच, ही बाब काँग्रेसच्या प्रतिनिधीकडून निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने माहिती पुरविली नाही आणि चौकशी रोखण्याचा प्रयत्न करुन ‘मतचोरी’ केली आहे, असाही राहुल गांधी यांनी आरोप केला आहे. तथापि, अशा प्रकारे ऑनलाईन नावे काटता येत नाहीत, हे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. नंतर रात्री कर्नाटकाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही या एकंदर प्रकरणावर प्रकाश टाकला असून गांधी यांचे आरोप पूर्णत: निराधार असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.
मुख्य अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण
कर्नाटकाच्या आळंद विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावे ऑनलाईन काटण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. तथापि, ही बाब लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगानेच या संबंधात कर्नाटक पोलिसांकडे तक्रार करत त्यांना चौकशी करण्याची विनंती केली होती. ज्या मोबाईल फोनवरुन हा प्रयत्न करण्यात आला होता, त्याचा क्रमांक, ज्या मतदारांची नावे काटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यांची नावे आणि इतर सर्व आवश्यक माहिती चौकशी अधिकाऱ्यांना त्याचवेळी पुरविण्यात आली होती. तसेच, नंतरही चौकशी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडे चौकशीच्या प्रगतीविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने कोणतीही हालचाल केली नाही, आणि चौकशी रोखण्याचा प्रयत्न केला, हा राहुल गांधी यांचा आरोप निराधार आणि चुकीचा आहे, असे कर्नाटक निवडणूक मुख्य अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
केवळ 24 नावे वगळली
राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार 6 हजारांहून अधिक नावे वगळण्यात आली आहेत. तथापि, कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार केवळ 24 नावे वगळण्यात आली आहे. ज्या 24 नावांवर वैध आक्षेप होते, त्यांची नावे नियमांच्या अनुसार चौकशी केल्यानंतर वगळली आहेत. उरलेल्या 5 हजार 900 हून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आलेली नव्हती. ती आत्ताही मतदारसूचीत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गांधी यांच्या आरोपांवरच आता प्रश्नचिन्ह लागल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आळंद मतदारसंघाची परिस्थिती
आळंद विधानसभा मतदारसंघात 1994 पासून 2023 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत एकदाही काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही. तेव्हापासून ही जागा चारवेळा कर्नाटक काँग्रेस पक्षाने (केसीपी), एकदा संयुक्त जनता दलाने आणि एकदा भारतीय जनता पक्षाने जिंकली आहे. 29 वर्षांमध्ये प्रथम 2023 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तेथे ‘मतचोरी’ करून काँग्रेसला हरविण्याचा प्रयत्न करण्यात आला, असाही आरोप गांधी यांनी केला होता. तथापि, 29 वर्षांमध्ये प्रथमच ज्या ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला, तेथे त्याच निवडणुकीत ‘मतचोरी’ झाली, हा राहुल गांधी यांचा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे, असा प्रतिवार भारतीय जनता पक्षाने केला आहे.
मतदारांना भ्रमित करण्याचे प्रयत्न
सततच्या पराभवाने राहुल गांधी निराश झाले असून त्यामुळे ते निराधार आरोप करीत आहेत. मतदारांना भ्रमित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. असे केल्याने त्यांचा जनाधार वाढणार नाही. असे प्रयत्न त्यांच्यासाठीच हानीकारक ठरू शकतात, अशीही टीका भारतीय जनता पक्षाकडून गांधी यांच्यावर करण्यात आली आहे.
Comments are closed.