यासिन मलिकचा सनसनाटी आरोप
दहशतवादी हफीझ सईदला भेटल्यामुळे मानले होते मनमोहन सिंग यांनी आभार, मोठा वाद पेटणे शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काश्मीरमधील दहशतवादी आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेचा म्होरक्या यासीन मलीक याने दिवंगत माजी नेते मनमोहनसिंग यांच्यावर बाँब टाकला आहे. 2006 मध्ये आपण पाकिस्तानात जाऊन दहशतवादी हफिझ सईद याची भेट घेतली होती. त्यामुळे मनमोहनसिंग यांनी आपले आभार मानले होते, असा दावा त्याने केला आहे. 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता, त्याचा प्रमुख सूत्रधार हफिझ सईद हा आहे. मलीक याच्या या दाव्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
मलीक याने हा दावा दिल्ली उच्च न्यायालयात 25 ऑगस्टला सादर केलेल्या एका प्रतिज्ञापत्रात केला आहे. 2006 मध्ये आपण पाकिस्तानला दिलेली भेट स्वत:हून दिलेली नव्हती. त्यावेळच्या केंद्र सरकारच्या एका ज्येष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने आपल्याला पाकिस्तानला जाण्याची विनंती केली होती. भारत त्यावेळी पाकिस्तानशी शांततेसंबंधी गुप्त चर्चा करत होता. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी चर्चा केल्याशिवाय शांततेचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे त्यावेळी भारत सरकारला वाटत होते. त्यामुळे या अधिकाऱ्याने मला हफिझ सईद याच्याशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची विनंती केली होती. या सूचनेचे मी पालन केले होते. सईद याच्याशी चर्चा केल्याने मनमोहनसिंग यांनी माझे आभारही मानले होते, असे स्पष्ट प्रतिपादन मलीक याने या प्रतिज्ञापत्रात केले आहे. या गुप्तचर अधिकाऱ्याचे नाव व्ही. के. जोशी असल्याचेही त्याने नमूद केले आहे.
सईदचे दहशतवाद्यांना आवाहन
मलीक याच्या समोरच सईद याने पाकिस्तानातील कुप्रसिद्ध दहशतवाद्यांचा एक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्याने या दहशतवाद्यांना भारतात शांतता भंग करु नका. शांततेचा मार्ग अनुसरा, असे आवाहन केले होते. पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी चर्चा केल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही. केवळ पाकिस्तानच्या सरकारशी चर्चा करुन काहीही उपयोग होणार नाही, असे मीच मनमोहनसिंग यांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केले होते. त्यामुळे मनमोहनसिंग यांनी ही जबाबदारी माझ्यावरच टाकली होती, असे मलीक याचे म्हणणे आहे.
शांतता विकत घ्या
जर कोणी तुमच्यासमोर शांततेचा प्रस्ताव ठेवला असेल, तर त्याच्याकडून तुम्ही शांतता ‘विकत’ घ्या, असा सल्ला सईद याने दहशतवाद्यांना दिला होता. यासाठी त्याने इस्लामचा धर्मग्रंथ कुराणचा आधार घेतला होता. हिंसा सोडून शांततेच्या मार्गाने चालण्याचा त्याने दहशतवाद्यांना त्याने दिला होता, असाही खळबळजनक दावा मलीक याने प्रतिज्ञापत्रात केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
काँग्रेसची जबरदस्त कोंडी
मलीक याने प्रतिज्ञापत्रात केलेले दावे खरे असतील, तर काँग्रेसने मनमोहनसिंग यांच्या काळात कशा प्रकारे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसमोर नमते घेतले होते आणि त्यांच्याकडून शांतता ‘विकत’ घेण्याचा प्रयत्न चालविला होता, हे स्पष्ट होईल. यामुळे त्या पक्षाची मोठी कोंडी होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मलीक याच्यावर 1990 मध्ये भारतीय वायुदलाच्या चार अधिकाऱ्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. अशा व्यक्तीला पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी चर्चा करण्यासाठी मनमोहनसिंग यांच्या सरकारने पाठविले होते, ही बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे काँग्रेसचे दहशतवाद्यांसंबंधात कसे बोटचेपे धोरण होते, यावरही मलीक याच्या प्रतिज्ञापत्रातून प्रकाश पडतो. अर्थात, मलीक याची विधाने सत्य की असत्य हे अद्याप ठरायचे आहे. तरीही त्याचे प्रतिज्ञापत्र चर्चेचा विषय ठरले आहे.
Comments are closed.