‘रामलीला’मध्ये पूनम पांडे बनणार मंदोदरी

दिल्लीच्या लाल किल्ला मैदानावर होणाऱ्या लव-कुश रामलीलामध्ये अभिनेत्री पूनम पांडे ही रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार आहे, परंतु पूनम पांडेला इंद्रप्रस्थ विश्व हिंदू परिषदेने विरोध केला असून तिने हे पात्र साकारण्यावर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी व्हीएचपीने लव्ह-कुश रामलीला समितीला पत्र पाठवून या निर्णयावर फेरविचार करावा, अशी विनंती केली आहे. रामलीला केवळ नाटय़प्रस्तुती नाही, तर हिंदुस्थानी समाज आणि संस्काराचा एक जिवंत भाग आहे. युनेस्कोने रामलीला दिलेल्या सांस्कृतिक महत्त्वाची आठवणही व्हीएचपीने समितीला करून दिलीय. मंदोदरीचे चरित्र गुण, मर्यादा, संयम आणि आदर्शाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या पात्रासाठी कलाकाराची निवडसुद्धा आदर्शांना ध्यानात ठेऊन करायला हवी. पूनम पांडे हिची सार्वजनिक जीवनात वावरताना प्रतिमा चांगली नाही. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या भाविकांना मनस्ताप होऊ शकतो, यामुळे समितीने यावर पुन्हा एकदा विचार करावा, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. लव-कुश रामलीला समितीने मला या ऐतिहासिक आणि भव्य रामलीलाच्या आयोजनात सहभागी होण्याच्या संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. मला प्रचंड आनंद झाला असून मी स्वतःला भाग्यशाली समजते, अशी प्रतिक्रिया पूनम पांडेने दिली आहे.

Comments are closed.