आजोबा अजित पवारांच्या जनता दरबारात पोहोचले, पिंपरी महानगरपालिकेचा प्रताप कानावर घातला, म्हणाले.
Ajit Pawar in Pimpri Chinchwad: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार यांनी जनता दरबार घेतला आहे. शनिवारी सकाळी या जनता दरबाराला (Janta Darbar) सुरुवात झाली. या जनता दरबारात आलेल्या एका आजोबांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. हे आजोबा अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे एक तक्रार घेऊन आले होते. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बिनडोक कारभाराबाबत सांगितलेला किस्सा ऐकून उपस्थितांना डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली.
पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या जनता दरबारात 79 वर्षीय सुभाष बोधे आले होते. या आजोबांनी पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रशासक काळात झालेल्या कारभार मांडला. बोधे कुटुंबियांच्या घरासमोर पालिकेने रस्त्याचे केलेलं काम, त्यातून झालेला त्रास आणि दाद मागितल्यानंतर त्यांना मिळालेली उत्तरं हा सर्व घटनाक्रम आजोबांनी अजित दादांसमोर मांडला. त्यांनी अजित पवारांना सांगितले की, आधी माझ्या घराला समांतर असा रस्ता होता. मात्र, आता रस्ता पाच फूट खाली आणि घर वर झाल्यानं ते गाडी पार्क करु शकत नाहीत. अशात गाडी बदलण्याचा अजब सल्ला पालिकेकडून मिळाला. यावर आता अजितदादा पालिका प्रशासनाला काय आदेश देतात, हे पाहावे लागेल.
अजित पवार यांच्या जनता दरबाराच्यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चा रंगल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी स्वतः पालकमंत्री अजित पवारांनी जनता दरबार घेतलाय. आयएएस, आयपीएस दर्जाचे सगळे अधिकारी मंचावर बसवून म्हणजेच शासकीय यंत्रणेला सोबत घेऊन अजित दादांचा हा कारभार सुरु आहे. महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सुरु असलेल्या या जनता दरबारातून अप्रत्यक्षपणे प्रचार सुरु आहे, असं म्हणायलाही वाव आहे. कारण पालकमंत्री म्हणून जर ते हा जनता दरबार घेतायेत, तर फक्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथं उपस्थित का आहेत? भाजपचे आमदार, शहराध्यक्ष ही इथं उपस्थित असणं अपेक्षित होते. असे असलं तरी भाजपने यावर सोयीस्कररीत्या चुप्पी साधलेली आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांनी नेहमीप्रमाणे फोन उचलणे टाळले आहे, आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आम्ही प्रतिक्रिया देणार का, हे कळवतो असे म्हटले. तर आमदार अमित गोरेखेनीं, मी पुण्यात आहे अन शहरात आल्यावर कळवतो, असं उत्तर दिले. कदाचित अजितदादांच्या भीतीपोटी भाजपचे हे नेते बोलणं टाळत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.
https://www.youtube.com/watch?v=gvinldojyik
आणखी वाचा
वेळ न सांगता येऊन बघा, मनोहर पर्रिकर फिरायचे, तसं फिरा…; पुण्यातील महिलेचा अजितदादांना सल्ला
आणखी वाचा
Comments are closed.