स्मार्ट मीटर मोफत लावणार सांगून ग्राहकांच्या खिशातून वसूली, शिवसेनेचा 23 सप्टेंबरला महावितरणवर धडक मोर्चा

महावितरण सध्या स्मार्ट मीटरचे नाव बदलून स्मार्ट टीओडी या नावाने मीटर लावले जात आहेत. नवीन मीटरमुळे वीजबीलात भरमसाठ वाढ झाली आहे. वाढत्या वीजबीलामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. स्मार्ट टिओडी मीटर मोफत बसवणे सांगून वीज दरातून त्याचा खर्च वसूल केला जाणार असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता महावितरणच्या रत्नागिरी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे.

महावितरणने स्मार्ट प्रीपेड मीटर हे कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी जाहिरात केली आहे. केंद्र सरकारचे अनुदान वगळता उर्वरित खर्च वीज दरवाढीच्या रूपाने ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जाणार आहे. सध्या ज्या ठिकाणी स्मार्ट टीओडी मीटर बसवले आहेत त्यांचे वीजबील दुप्पट येऊ लागल्याने वीजग्राहक हवालदिल झाले आहेत. पावसाळ्यात वीजेचा वापर कमी असताना दुप्पट बील येते, मग उन्हाळ्यात वीजबील किती येईल? असा प्रश्न वीजग्राहकांना पडला आहे.

स्मार्ट टीओडी मीटरच्या विरोधात 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नाचणे रोड येथील माजी खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय ते महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत मोर्चा काढून शिवसैनिक अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, उपनेते आणि माजी आमदार बाळ माने, जिल्हासंपर्क प्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम आणि बाळा खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Comments are closed.