निर्णायक सामन्यात भारतीय महिला संघ गुलाबी जर्सीत; स्तन कर्करोगाविषयी जागरूकतेचा संदेश

भारतीय महिला संघ आज 20 सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत मालिकेतल 1-1 सामने जिंकले आहेत. आता सर्वांचे लक्ष तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यावर आहे. बीसीसीआयने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय महिला संघाच्या पारंपारिक निळ्या जर्सीऐवजी गुलाबी जर्सी घालण्यामागील कारण उघड केले आहे.

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी जर्सी घालण्यामागील कारण महत्त्वाचे आहे. टीम इंडियाचे उद्दिष्ट स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर अनेक खेळाडू गुलाबी जर्सी घालताना दिसत आहेत. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये बीसीसीआयने लिहिले आहे की, “स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी, टीम इंडिया आज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक खास गुलाबी जर्सी घालेल.”

आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय महिला संघासाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 281 धावा करूनही संघाला 8 विकेटने एकतर्फी पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने उल्लेखनीय पुनरागमन केले, प्रथम 292 धावा केल्या आणि नंतर ऑस्ट्रेलियन संघाला 190 धावांवर गुंडाळले, आणि सामना 102 धावांनी जिंकला. परिणामी मालिका 1-1 अशी बरोबरीत आली. टीम इंडियाकडे आता पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याची उत्तम संधी आहे.

Comments are closed.