तेच मैदान, तेच रेफरी…21 सप्टेंबरला पुन्हा होणार का 'नो हँडशेक' वाद?

21 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. ‘नो हँडशेक’ वादानंतर या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यातच या सामन्यातही अँडी पाइक्रॉफ्ट हेच मॅच रेफरी म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पीसीबीने आपल्या वक्तव्यांतून स्पष्ट केले आहे की त्यांना पाइक्रॉफ्टवर पूर्ण विश्वास नाही. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा वाद होऊ शकतो का?

पीटीआयच्या अहवालानुसार आयसीसीने भारत-पाकिस्तान सामन्यासाठी अँडी पाइक्रॉफ्ट यांनाच मॅच रेफरीची जबाबदारी दिली आहे. मागील भारत-पाक सामना झाल्यानंतर पीसीबीने पाइक्रॉफ्टवर अनेक आरोप केले होते. अगदी बोर्डाच्या एका पत्रकार परिषदेत रमिझ राजा यांनी तर पाइक्रॉफ्टवर टीम इंडियाच्या बाजूने पक्षपात केल्याचा आरोपही केला होता. अशा परिस्थितीत पाइक्रॉफ्ट पुन्हा मॅच रेफरी असल्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डला नाराजी वाटू शकते. मात्र आयसीसी आपला निर्णय परत घेण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे टॉसच्या वेळी सलमान अली आगा आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह मॅच रेफरी म्हणून अँडी पाइक्रॉफ्टच दिसणार आहेत.

पहिल्या सामन्यात टॉसच्या वेळी सूर्यकुमार यादव यांनी सलमान अली आगाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. त्यानंतर विजय मिळवूनही टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवण्यास नकार दिला. टीम इंडिया 21 सप्टेंबरलाही हाच ठाम पवित्रा कायम ठेवणार आहे. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानची टीमही आता हस्तांदोलन न करण्यास तयार झाली आहे. त्यामुळे 21 सप्टेंबरच्या सामन्यात ‘नो हँडशेक’चीच परिस्थिती राहणार आहे. आता दोन्ही संघांचीही इच्छा असेल की या सामन्यातून नवा वाद निर्माण होऊ नये. भारत-पाकिस्तान संघ जेव्हा मैदानावर आमनेसामने येतात, तेव्हा अशा परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नेहमीच राहते.

Comments are closed.