लंडन, ब्रुसेल्स आणि बर्लिनसह युरोपातील प्रमुख विमानतळांवर सायबर हल्ले… प्रचंड गोंधळ

लंडन, ब्रुसेल्स आणि बर्लिनसह युरोपातील प्रमुख विमानतळांवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे आज प्रचंड गोंधळ उडाला. चेक-इन आणि बार्ंडग यंत्रणेला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. त्यामुळे युरोपमधील हवाई वाहतूक विस्कळीत झाली. युरोपातील अनेक विमानतळांवर प्रवाशांची रखडपट्टी झाली.
कॉलिन्स एरोस्पेस या कंपनीच्या म्यूज सॉफ्टवेअरद्वारे विमानतळांवर चेक-इन आणि बार्ंडग केले जाते. या सॉफ्टवेअरमध्येच तांत्रिक बिघाड झाल्याचे शुक्रवारी संध्याकाळी समोर आले. कालांतराने हा सायबर हल्ला असल्याचे समोर आले. त्यामुळे विमानतळावरील ग्राऊंड क्रूला चेक-इन आणि बार्ंडगचे बहुतेक सोपस्कार करावे लागले. त्यासाठी बराच वेळ जात असल्याने विमानसेवा विस्कळीत झाली. अनेक उड्डाणे रद्द करावी लागली.
ब्रुसेल्सच्या विमानतळावर शुक्रवारी रात्री चेक-इन आणि बार्ंडग सेवा देणाऱया कंपन्यांच्या यंत्रणेवर सायबर हल्ला झाला. त्यामुळे ब्रुसेल्स विमानतळासह अनेक युरोपीय विमानतळांना फटका बसला. बर्लिनच्या ब्रँडनबर्ग विमानतळावरही हाच प्रकार घडला. येथेही प्रवासी व्यवस्थापन सेवा पाहणाऱया कंपनीच्या सॉफ्टवेअरवर सायबर हल्ला झाला.
विमानतळ व्यवस्थापनांचे प्रवाशांना आवाहन
युरोपमधील सर्वात व्यग्र असलेल्या लंडनच्या हिथ्रो विमानतळ व्यवस्थापनाचीही सायबर हल्ल्यामुळे तारांबळ उडाली. हिथ्रो विमानतळाने या संदर्भात निवेदन जारी केले. जगभरातील अनेक विमानतळांवर असंख्य विमान कंपन्यांसाठी चेक-इन आणि बार्ंडग व्यवस्था पाहणाऱ्या कॉलिन्स एरोस्पेसच्या सेवेत तांत्रिक अडथळे येत आहेत. त्यामुळे विमानांच्या उड्डाणास विलंब लागू शकतो. प्रवाशांनी विमानतळावर येण्याआधी विमान कंपन्यांकडे फ्लाइटच्या वेळेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन विमानतळ व्यवस्थापनांनी केले आहे.
हिंदुस्थानी विमानसेवा सुरळीत
युरोपच्या विमानतळांवरील सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली विमानतळावर खबरदारी घेण्यात आली. चेक-इन आणि बार्ंडग करणाऱ्या सॉफ्टवेअरची तपासणी करण्यात आली, मात्र सेवेत कुठलाही अडथळा येत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विमान कंपन्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Comments are closed.