H-1B Visa Fee Hike : अमेरिकेचे आक्रमण नव्हे सरकारचे मौन ही खरी समस्या – आदित्य ठाकरे

एच 1 बी व्हिसा शुल्कवाढीच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली. ‘अमेरिकेकडून होत असलेले आर्थिक हल्ले ही आपली खरी समस्या नाही, तर या सगळ्यावर केंद्र सरकारने बाळगलेले धक्कादायक मौन ही खरी समस्या आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

‘एक्स’वर पोस्ट करून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या धोरणांचा आणि घोषणांचा समाचार घेतला. ‘आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि अशा अनेक घोषणा प्रत्यक्षात आल्या असत्या तर अमेरिकेच्या निर्णयामुळे देशात इतका गोंधळ उडालाच नसता. डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया आणि टॅरिफने आपल्याला आधीच जबर तडाखा दिला आहे. सत्ताधारी कितीही जोरकस बोलत असले आणि त्यांची भाषणं कितीही धाडसी वाटत असली तरी कठोर वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ते म्हणाले.

‘अमेरिकेचा हा निर्णय हिंदुस्थानातील लाखो प्रोफेशनल्सचेच नव्हे, तर त्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांचेही नुकसान करणारा आहे. इतकेच नव्हे, उत्तम करियर आणि चांगल्या जगाची स्वप्ने पाहणाऱ्या हजारो तरुणांच्या आकांक्षांनाही यामुळे धक्का बसणार आहे,’ अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

गौरवशाली परदेश दौऱ्यांवर बोलणार नाही!

‘गेल्या 11 वर्षांत झालेल्या गौरवशाली विदेश दौऱ्यांवर आणि त्यामुळे आकाराला आलेल्या हिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरणांवर मला काही बोलायचे नाही. मात्र एक हिंदुस्थानी म्हणून आमच्या सरकारने आमच्याशी आणि अमेरिकेशी बोलावे एवढीच अपेक्षा आहे. हिंदुस्थान-अमेरिकेचे महान संबंध जगासाठी चांगले असतील, पण आपल्या सरकारचे मौन त्यांच्याकडे डोळे लावून बसलेल्यांना अंधारात ढकलणारे आहे,’ असे परखड मत आदित्य ठाकरे यांनी मांडले.

Comments are closed.