SL vs BAN: बांगलादेशचा 4 विकेट्सने थरारक विजय, शेवटच्या षटकात श्रीलंकेचा पराभव
आशिया कप 2025च्या पहिल्या सुपर-4 सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 4 विकेट्सने पराभव केला. सामन्याच्या शेवटच्या षटकात बांगलादेशने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 7 विकेट गमावून 168 धावा केल्या. श्रीलंकेकडून दासुन शनाका हा एकमेव फलंदाज होता ज्याने अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात बांगलादेशने 19.5 षटकांत 6 विकेट गमावून 169 धावा केल्या. बांगलादेशने सुपर-4 मोहिमेची सुरुवात विजयाने केली.
नाणेफेक गमावल्यानंतर श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली. पथुम निस्सांका आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिली विकेट पडल्यानंतर, श्रीलंकेने नियमित अंतराने विकेट गमावल्या. पथुम निस्सांका (22 धावा), कुसल मेंडिस (34 धावा), कुसल परेरा (16 धावा) आणि चरिथ असलंका (21 धावा) यांनी चांगली सुरुवात केली पण त्यांना मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करण्यात अपयश आले. श्रीलंकेचे एकमेव अर्धशतक दासुन शनाकाचे होते, जो 37 चेंडूत 64 धावा करत नाबाद राहिला. त्याने आपल्या डावात तीन चौकार आणि सहा षटकार मारले. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रहमानने शानदार गोलंदाजी केली त्याने चार षटकांत फक्त 20 धावा देत तीन विकेट्स घेतल्या.
169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला सुरुवात खराब झाली, पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पहिला बळी गमावला तन्झिद हसन तमीम दोन चेंडूत बाद झाला. त्यानंतर सैफ हसन आणि लिटन दास यांनी दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. या सामन्यात लिटन दास 16 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. यानंतर, संघाला 114 धावसंख्येवर तिसरा धक्का बसला. सैफ हसन 45 चेंडूत 61 धावा करुन बाद झाला. येथून, तौहीद हृदयॉयने उर्वरित काम केले. तो 37 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. शेवटी, शमीम हुसेन 12 चेंडूत 14 धावा करून नाबाद राहिला. श्रीलंकेकडून, वानिन्दु हसरंगाने 4 षटकात 22 धावा देत 2 बळी घेतले.
Comments are closed.