न्यू हॉलीवूड – पडद्यामागची क्रांती
>> अक्षय शेलर
प्रेक्षक, दिग्दर्शक आणि स्टुडिओ या तिघांचं नातं नव्यानं घडवून आणणारा काळ म्हणजे `हॉलीवूड रेनॅसान्स’चा काळ. या न्यू हॉलीवूड ठरलेल्या काळातील निवडक चित्रपट आणि दिग्दर्शकांचा अधिक खोलवर विचार करीत त्या कलाकृतींचा वेध घेणारे सदर.
अमेरिकन सिनेमाच्या इतिहासात 1967 ते 1980 या काळाला `न्यू हॉलीवूड’ किंवा `हॉलीवूड रेनॅसान्स’ असं म्हटलं जातं. जुनं स्टुडिओ युग संपून दिग्दर्शकांना केंद्रस्थानी आणणारा, प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीशी जुळवून घेणारा आणि अमेरिकन समाजाच्या अस्वस्थ वास्तवाशी भिडणारा हा काळ होता. या चळवळीमुळे केवळ काही गाजलेले चित्रपटच निर्माण झाले नाहीत, तर संपूर्ण अमेरिकन चित्रभाषा बदलली.
हॉलीवूडच्या सुवर्णकाळातील `स्टुडिओ सिस्टम’ ही एका ठरावीक साचेबद्ध पद्धतीवर चालणारी मोठी यंत्रणा होती. 1930 ते 1950च्या दशकात एमजीएम, वॉर्नर ब्रदर्स, पॅरामाऊंट, 20एथ सेंच्युरी फॉक्स, आरकेओ पिक्चर्स असे प्रमुख स्टुडिओ उत्पादन, वितरण आणि प्रदर्शन या संपूर्ण प्रािढयेवर नियंत्रण ठेवत. कलाकार हे त्यांच्या कायमस्वरूपी कराराखाली असायचे. कोणता अभिनेता कुठल्या भूमिकेत दिसेल, कोणत्या शैलीचे चित्रपट बनतील, याचा निर्णय स्टुडिओ प्रमुख घेत असत. परिणामी दिग्दर्शक वा पटकथाकाराची स्वतंत्र कलात्मक दृष्टी फारशी पुढे येत नसे.
स्टुडिओ सिस्टममुळेच हॉलीवूडचं जागतिक बाजारपेठेतलं वर्चस्व प्रस्थापित झालं होतं, पण या पद्धतीत प्रचंड व्यापारीकरण होतं. ठरावीक नायक-नायिका, ठरावीक शैली आणि सुखांत ही या यंत्रणेची ओळख होती. हळूहळू ही पद्धत कंटाळवाणी होऊ लागली. दरम्यान, 1960च्या दशकात अमेरिकेत मोठे राजकीय-सामाजिक धक्के बसले. व्हिएतनाम युद्ध, नागरी हक्क चळवळ, लैंगिक स्वातंत्र्याच्या मागण्या, ड्रग्ज संस्कृती या सर्व घडामोडींनी अमेरिकन युवकांचं भान बदललं होतं. त्याचवेळी (`क्लिओपात्रा’सारखे) भव्य म्युझिकल्स बॉक्स ऑफिसवर दणक्यात अपयशी ठरत होते. स्टुडिओंना तोटा होत होता आणि तरुण प्रेक्षक युरोपियन आर्ट सिनेमा, फ्रेंच न्यू वेव्ह, इटालियन नववास्तववाद (निओ-रिअॅलिझम) यांकडे आकर्षित होत होते. हीच पोकळी भरून काढण्यासाठी स्टुडिओंनी नव्या पिढीतील दिग्दर्शकांना संधी दिली.
न्यू हॉलीवूडने सर्वात मोठा बदल घडवून आणला तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत. सिनेमाविषयक चर्चेत ओतूर ही संकल्पना प्रचलित झाली, या काळात निर्माण झालेल्या चित्रपटांनी पारंपरिक हिरोइझमला प्रश्न विचारला. नायक `परिपूर्ण’ न राहता `अँटी-हिरो’ समोर येऊ लागले. नैतिकदृष्टय़ा संदिग्ध, समाजाशी विसंगत, कधी हिंस्र तर कधी स्वतला हरवून बसलेले अँटी-हिरो. प्रेक्षकांनीही या नव्या नायकांना स्वीकारलं. कारण ते त्यांच्या जगण्याशी अधिक जवळचे वाटत होते. कथानक एकरेषीय पद्धतीनं न सांगता प्रयोगशील रचना, उघडे शेवट, अचानक खंडित होणारी कथा अशा नवनव्या तंत्रांचा वापर झाला. या चित्रपटांनी समाजाशी थेट संवाद साधला. व्हिएतनाम युद्ध, वॉटरगेट स्कँडल, अमेरिकन शहरांतील हिंसा, वर्णभेद या साऱयांचा परिणाम चित्रपटांच्या कथांवर दिसून आला.
`इझीरायडर’, `द गॉडफादर’, `टॅक्सी ड्रायव्हर’, `चायनाटाऊन’ यांसारख्या चित्रपटांनी अमेरिकन प्रेक्षकांच्या सवयीच बदलून टाकल्या. थोडक्यात, हॉलीवूड सिनेमा हा केवळ `एंटरटेन्मेंट फॅक्टरी’ उरला नाही, तर गंभीर कलात्मक प्रयोगांची जागा ठरू लागला.
तरीही न्यू हॉलीवूड कायमस्वरूपी टिकणारे नव्हते. 1975 मध्ये `जॉज्’ आणि 1977 मध्ये `स्टार वॉर्स’ या प्रचंड यशस्वी ठरलेल्या चित्रपटांनी ब्लॉकबस्टर युगाची सुरुवात केली. हळूहळू स्टुडिओंना लक्षात आलं की, मोठय़ा प्रमाणात प्रेक्षक खेचण्यासाठी प्रचंड बजेटचे, रोमांचकारी व तंत्रज्ञानप्रधान चित्रपटच उपयोगी ठरतात. दुसरी मर्यादा म्हणजे अनेक दिग्दर्शकांच्या अतिविलक्षण दृष्टीमुळे चित्रपटक्षेत्र आर्थिकदृष्टय़ा डगमगले. `हेवन्स गेट’सारख्या (1980) महाकाय अपयशांनी स्टुडिओंना पुन्हा नियंत्रण हातात घ्यायला भाग पाडलं. परिणामी दिग्दर्शककेंद्री काळ ओसरला आणि व्यापारी गणिताने चालणारे ब्लॉकबस्टर युगाचं आगमन निश्चित झालं.
न्यू हॉलीवूड ही केवळ काही दिग्दर्शकांची वा काही चित्रपटांची लाट नव्हती. ती संपूर्ण अमेरिकन समाजाच्या बदलत्या वास्तवाची छाया होती. स्टुडिओंच्या कठोर वर्चस्वातून सुटून दिग्दर्शकाला स्वतंत्र कलात्मक ओळख देणारी ही चळवळ होती. जरी ती मर्यादित काळापुरती टिकली, तरी तिच्या वारशातून पुढील पिढय़ांचे अनेक दिग्दर्शक प्रभावित झाले. त्यानंतर आजतागायत जे अनेक दिग्दर्शक ज्या धाडसाने चित्रपट बनवतात, त्यामागे निश्चितच न्यू हॉलीवूडचा प्रभाव आहे.
न्यू हॉलीवूडचा काळ म्हणजे पडद्यामागची एक ाढांती होती, ज्यातून प्रेक्षक, दिग्दर्शक आणि स्टुडिओ या तिघांचं नातं नव्यानं घडवून आणलं गेलं. या स्तंभाच्या पुढील भागापासून आपण त्या काळातील निवडक चित्रपट आणि दिग्दर्शकांचा अधिक विचार करू.
Comments are closed.