क्रिकेटप्रेमी नाराज झाले! सफर-ए-यूएई

>> संजय खडे

दोस्त लोक, शुक्रवारी आपल्या संघाचा खेळ पाहून मी नाराज झालो. हिरमुसलो. तुमचं काय? शप्पथ घेऊन सांगा. सामना जिंकला, पण ओमानविरुद्धचा सामना फक्त एकवीस धावांनी जिंकावा हे पचवणं अन् जल्लोष व्हावा असं नव्हतं. कालचं जिंकणं, जिंकणं नव्हतं. मजा नाही आली राव!

सुपर-फोरमध्ये आधीच प्रवेश झालाय म्हणून संधी न मिळालेल्यांना संधी दिली. बुमरा आणि वरुणऐवजी अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा संघात आणले. प्रयोग फसला. पुरे आठ गोलंदाज ओमानचे केवळ चार फलंदाज बाद करू शकले! त्यात खेळपट्टीने दुसऱया डावात अपेक्षित मोडतोड दाखवली नाही हे कारण असू शकेल, पण आपले गोलंदाज बिलकूल परिणामकारक वाटले नाहीत.

हिंदुस्थानने 188 धावा चोपल्या खऱया, पण आमच्या अपेक्षा? कमकुवत संघासमोर विक्रमांची तडतडी लागण्याची आमची हुरहूर विजूनच गेली. अभिषेक आकर्षक, आक्रमक आहे. पण आत्मसंतुष्ट वाटतो. टी-ट्वेंटी असंच खेळतात असं तुम्ही म्हणाल. पण अधीर फटके मारण्याची सवय क्षणात लागू शकते. सॅमसनचं अर्धशतक त्याला स्वतःलाही नाराज करून गेलं असेल. अक्षर आणि तिलक विशीत आटपले…

शुभमनला त्रिफळाचीत करणारा डावऱया फैसलचा आत आलेला चेंडू सुपर-डुपर होता! आणि एक ताकीद, कुलदीपने आत्मविश्वासाच्या आहारी न गेलेलंच बरं. फसलेला रिह्यू त्याने स्वतःच कप्तानचे दोन्ही हात उचलून मागितला!

याउलट, ओमानवासी चमकून गेले! त्यांच्यासमोर तर दारासिंग उभा होता. पण डावरे कलीम आणि फैसल आपल्या बहाद्दरांना चकित करून गेले. जितेंद्रनेही दोन बळी घेतले अन् दोघांना धावचीत केलं. फलंदाजीत कप्तान जतिंदर, कलीम अन् यष्टिरक्षक मिर्झा यांच्या बॅट्स मस्तपैकी फिरल्या.
कमकुवत संघ म्हणून आम्ही सामना हलक्यात घेतला का? कालची फलंदाजी, गोलंदाजी आपल्याला स्पर्धेत अजिंक्यपद देऊ शकेल का? आपण

अजिंक्यपद ग्राह्य धरलंय का?

एक बाजू अशीही असू शकते. कमकुवत संघासमोर हरण्याची कल्पना मनाला चाटून जाते, मग पाय जड होतात. मनात चलबिचल घरटं बांधून जाते. हा धोका टाळा. अजून स्पर्धा बाकी आहे…

Comments are closed.