8 वर्षांची चिमुरडी नराधमांना भिडली, हाताला चावा घेत आरडाओरडा केल्यानं अपहरणाचा प्रयत्न फसला; कोल्हापुरातील नांदणीमधील थरार

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात येणाऱ्या नांदणी 8 वर्षीय मुलीने स्वत:च्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला. स्वरा शितल देसाई असे या मुलीचे नाव आहे. दुर्गावतार घेतलेल्या या मुलीने अपहरणकर्त्यांच्या हाताचा करकचून चावा घेत आरडाओरडा केला. यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी रात्री स्वरा देसाई या 8 वर्षाच्या चिमुरडीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. या चिमुरडीने अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेऊन आरडाओरड केल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञातांनी हा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले नाहीत.
स्वरा लहान भावासह दूध आणण्यासाठी डेअरीकडे जात होती. यावेळी तीन ते चार जण अंधाराचा फायदा घेत तोंड दाबून तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या प्रकाराने लहान भाऊदेखील घाबरला. प्रसंगावधान राखत स्वराने अपहरणकर्त्याच्या हाताचा चावा घेऊन मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. तिचा आरडाओरडा ऐकून काही जण घराबाहेरही आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्ते शिरोळ मार्गावरून पोबारा केला.
पालकांनी तातडीने शिरोळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. शिरोळ पोलिसांनी रात्री उशिरा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. पण अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने अपहरणकर्त्यांची माहिती मिळू शकली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments are closed.