महिला वनडे रँकिंगमध्ये भारताचं मोठं नुकसान, ऑस्ट्रेलियाने दिला दुहेरी धक्का!!

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला. शनिवारी, 20 सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या हायस्कोरिंग सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर तब्बल 413 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारतानेही जोरदार लढत देत स्मृती मानधनाच्या वादळी शतकाच्या जोरावर 369 धावांपर्यंत मजल मारली. अखेर टीम इंडिया हा निर्णायक सामना 43 धावांनी हरली. या पराभवासह टीम इंडियाने मालिका गमावलीच, शिवाय आयसीसी क्रमवारीतही घसरण झाली.

दिल्लीतील या सामन्यापूर्वी भारत दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाने या विजयामुळे अव्वल स्थान कायम राखले आहे, तर भारत दुसऱ्यावरून तिसऱ्या स्थानावर घसरला. भारताच्या पराभवाचा फायदा इंग्लंडला झाला असून ते आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

जरी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असला तरी त्यांच्या रेटिंगमध्ये घसरण झाली. सामन्यापूर्वी त्यांची रेटिंग 167 होती जी आता 164 झाली आहे. भारताची रेटिंग आता 126 इतकी आहे.

30 सप्टेंबरपासून महिला वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्याआधी झालेला हा पराभव आणि क्रमवारीतील घसरण खेळाडूंच्या मनोबलावर परिणाम करू शकते.

क्रमांक युनियन रेटिंग्ज
1 ऑस्ट्रेलिया 164
2 इंग्लंड 126
3 भारत 126
4 न्यूझीलंड 96
5 दक्षिण आफ्रिका 93
6 श्रीलंका 82
7 बांगलादेश 79
8 पाकिस्तान 74
9 वेस्ट इंडिज 71
10 आयर्लंड 51

भारताला पराभव पत्करावा लागला असला तरी स्मृती मानधनाने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने केवळ 50 चेंडूत शतक झळकावले. ती आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये (महिला व पुरुष दोन्ही) सर्वात जलद शतक ठोकणारी भारतीय ठरली आहे.

इतकेच नव्हे तर भारताने महिला वनडेत प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 300 धावांचा टप्पा ओलांडला. 369 धावांचा डोंगर उभारून भारताने इंग्लंडचा विक्रम मोडला. इंग्लंडने 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 298/8 असा स्कोर केला होता.

Comments are closed.