जीएसटी बचत उत्सवाच्या शुभेच्छा, देशाला डझनभर करांच्या जाळ्यातून बाहेर काढलं : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणि स्वदेशी या दोन गोष्टींवर देशातील जनतेला मार्गदर्शन केलं. गरीब आणि नवमध्यमवर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. वन नेशन वन टॅक्सचं स्वप्न जीएसटीमुळं साकार झालं. सुधारणा ही निरंतर सुरु असणारी प्रक्रिया आहे. सर्व राज्यांना सोबत घेत स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी कर सुधारणा केल्याचं मोदी म्हणाले. यामुळं देश डझनभर करांच्या जाळ्यातून बदल झाला, असं मोदी म्हणाले.

मोदींकडून जीएसटी बचत उत्सवाच्या शुभेच्छा (Narendra Modi on Next Generation GST Reforms)

नवरात्रीचं पर्व सुरु होत आहे, त्याच्या सर्वांना शुभेच्छा. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देश आत्मनिर्भर भारतासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलत आहे. उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 22 सप्टेंबरला सूर्योदयासह नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू होतील. उद्यापासून जीएसटी बचत उत्सव सुरु होत आहे. या उत्सवात तुमची बचत वाढेल, तुमच्या पसंतीच्या वस्तू अधिक सहजपणे खरेदी करु शकाल, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आपल्या देशाचे गरीब, मध्यवर्गीय लोक, नवमध्यमवर्ग, तरुण, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक या सर्वांना बचत उत्सवाचा फायदा होईल. म्हणजेच सणांच्या या हंगामात सर्वाचंं तोंड गोड होईल. देशातील प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढेल. देशाच्या कोट्यवधी कुटुंबांना नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्सची आणि बचत उत्सवाच्या शुभेच्छा देतो. या सुधारणा भारताच्या विकास कथेला वेगवान करतील,व्यवसाय सुलभ करतील. गुंतवणूक आकर्षक करतील. प्रत्येक राज्य विकासाच्या वाटेत बरोबरीचं साथीदार असेल, असं मोदी म्हणाले.

डझनभर कराच्या जाळ्यातून सोडवलं

जेव्हा भारतानं जीएसटी रिफॉर्मकडे पाऊल टाकलं होतं, तेव्हा जुना इतिहास बदलण्याची आणि नवा इतिहास रचण्याची सुरुवात झाली होती. कित्येक दशकं आपल्या देशातील जनता, व्यापारी वेगवेगळ्या कराच्या जाळ्यात अडकले होते, जकात, विक्री कर, उत्पन्न शुल्क, सेवा शुल्क असे एक डझनभर कर आपल्या देशात होते, असं नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी एक उदाहरण  दिलं, एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पोहोचवताना चेक पोस्ट पार करायला लागायचे, फॉर्म भरायला लागायचे, प्रत्येक ठिकाणी कराचे वेगवेगळे नियम होते. 2014 मध्ये देशानं मला पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली होती. तेव्हा विदेशात एका वृत्तपत्रात एक उदाहरण छापलं होतं. एका कंपनीच्या अडचणींचा उल्लेख होता. त्यात म्हटलं होतं, बंगळुरुतून 570 किलोमीटर दूर हैदराबादला वस्तू पाठवायच्या असतील तर ते आव्हानात्मक होतं. तेव्हा कंपनी ते साहित्य बंगळुरुतून यूरोप आणि यूरोपमधून हैदराबादला पाठवायचा विचार करत होती. मी फक्त जुनं उदाहरण देत आहे, असं मोदींनी म्हटलं.

नरेंद्र मोदी पुढं म्हणाले की तेव्हा लाखो कंपन्यांना, लाखो करोडो देशवासियांना वेगवेगळ्या करांमुळं अडचणी येत होत्या. साहित्य एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवण्याचा खर्च वाढत होता तो गरिबांना उचलावा लागत होता. देशाला या स्थितीतून बाहेर काढणं महत्त्वाचं होतं, यासाठी तुम्ही 2014 मध्ये संधी दिली जनहितासाठी, देशहितासाठी जीएसटीला आपली प्राथमिकता दिली. प्रत्येक घटकासोबत चर्चा केली. प्रत्येक राज्याच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं,प्रत्येक राज्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधलं. केंद्रानं सर्व राज्यांना सोबत घेत स्वतंत्र भारतातील मोठी कर सुधारणा केली, असं मोदी यांनी सांगितलं.

25 कोटी लोक गरिबीतून बाहेर

केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळं देश डझनभर  करांच्या जाळ्यातून मुक्त झाला. वन नेशन वन टॅक्सचं स्वप्न पूर्ण झालं. रिफॉर्म सातत्यानं चालणारी प्रक्रिया असते. जेव्हा वेळ बदलते तेव्हा देशाची गरज बदलते. तेव्हा नेक्स्ट जनरेशन बदल तितकेच आवश्यक असते. देशाची सध्याची गरज आणि भविष्याची गरज पाहता जीएसटीचे नवे रिफॉर्म्स लागू होत आहेत. आता फक्त 5 टक्के आणि  18 टक्के टॅक्स स्लॅब राहतील. दररोज लागणाऱ्या वस्तूंचे दर आणखी कमी होतील. अन्न धान्य, औषधे, साबण, ब्रश, पेस्ट, आरोग्य आणि जीवन विमा अशा अनेक गोष्टी आणि सेवा करमुक्त होतील किंवा 5 टक्के कर द्यावा लागेल. ज्या वस्तूंवर पूर्वी 12 टक्के कर द्यावा लागत होता त्यापैकी 99 टक्के वस्तू  5 टक्के कराच्या कक्षेत आल्या आहेत, असं मोदी यांनी सांगितलं.

गेल्या 11 वर्षाच्या काळात 25 कोटी लोकांनी गरिबीला पराभूत केलं आहे. गरिबीतून बाहेर निघून 25 कोटींचा समूह नवमध्यमवर्ग म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या वर्गाच्या नव्या आकांक्षा आहेत, स्वप्न आहेत. सरकारनं  12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत भेट दिली.  यामुळं मध्यमवर्गाच्या जीवनात किती बदल येतो. आता गरिबींची वेळ आहे, नवमध्यमवर्गाची वेळ आहे आता, मध्यमवर्गाला एका प्रकारे डबल गिफ्ट मिळणार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

अडीच लाख कोटींची बचत होणार

नरेंद्र मोदी पुढं म्हणाले की, जीएसटी कमी झाल्यानं देशाच्या नागरिकांना स्वप्न पूर्ण करणं सोपं होईल. घर बांधणं, टीव्ही खरेदी, स्कूटर, बाईक खरेदीसाठी कमी खर्च करावा लागेल. तुमच्यासाठी पर्यटन स्वस्त होईल. हॉटेलच्या खोल्यांवरील जीएसटी कमी केला आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की दुकानदार बंधू देखील उत्साही आहेत. जीएसटी कपातीचा उत्साह लोकांपर्यंत पोहोचवण्याच काम करत आहे. आम्ही नागरिक देवो भव: च्या मंत्रानं पुढं जात आहोत. नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्समध्ये याची झलक पाहायला मिळते. इन्कम टॅक्स आणि जीएसटीमधील सूट एकत्र केल्यास देशातील लोकांची अडीच लाख कोटींची बचत होईल. हा बचत उत्सव आहे, असं मोदींनी म्हटलं.

स्वदेशीचा नारा

नरेंद्र मोदींनी विकसित भारताचं लक्ष गाठण्यासाठी आत्मनिर्भर भारताच्या मार्गावरुन चालावं लागेल. भारताला आत्मनिर्भर बनवण्याची मोठी जबाबदारी लघू मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांवर आहे. जे देशातील लोकांच्या हिताचं आहे ते देशात बनवलं पाहिजे, असं म्हटलं. जीएसटीचे दर कमी झाल्यानं नियम आणि प्रक्रिया सोपी झाल्यानं एमएसएमईला खूप फायदा होईल.त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढेल, कर कमी द्यावा लागेल. यामुळं त्यांचा फायदा होईल. आज मी एमएसएमईकडून मोठ्या अपेक्षा ठेवत आहे. जेव्हा भारत समृद्धीच्या शिखरावर होता तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आपले एमएसएमई होते. भारताचं उत्पादन क्षेत्र, भारतात बनलेल्या उत्पदनांची गुणवत्ता चागंली होती. लघू उद्योग जी निर्मिती करतील ते जगभरात गुणवत्तापूर्ण असावं. आपल्या उत्पादनांची गुणवत्ता जगात भारताची ओळख वाढवेल, देशाचा नावलौकिक वाढवेल, असं मोदी म्हणाले.

देशाच्या स्वातंत्र्याला स्वदेशीच्या मंत्रानं ताकद मिळाली, त्याचप्रमाणं समृद्धी देखील स्वदेशीच्या मंत्रानं मिळेल. आपल्या खिशातील कंगवा देशी आहे की विदेशी माहिती नाही. आपण ज्या वस्तू खरेदी करा ज्या मेड इन इंडिया असेल. आपल्याला प्रत्येक खर स्वदेशीचं प्रतिक करायचं आहे. अभिमानानं सांगा मी स्वदेशी खरेदी करतो, स्वदेशी साहित्याची विक्री करतो. हे प्रत्येक भारतीयाचं ध्येय बनलं पाहिजे. हे जेव्हा बनले तेव्हा देश विकसित होईल. सर्व राज्य सरकारांनी आत्मनिर्भर भारतासह उत्पादनाला वेग द्या, गुंतवणुकीचं वातावरण निर्णय करा. केंद्र आणि राज्य एकत्र पुढं जातील तेव्हा भारताचं राज्य विकसित होईल आणि भारत विकसित होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सर्वांना नवरात्रीच्या आणि जीएसटी बचत उत्सवाच्या शुभेच्छा असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.https://www.youtube.com/watch?v=-p4ai05ospw

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.