अभिषेक-गिलची स्फोटक फलंदाजी, पाकिस्तानचा 6 गडी राखून दारुण पराभव!

आशिया कप 2025च्या दुसऱ्या सुपर-4 सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहज 6 विकेटने पराभव केला. पाकिस्तानने भारतासमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने हे लक्ष्य फक्त 18.5 षटकात 6 विकेट गमावून पूर्ण केले. या सामन्यात भारताकडून अभिषेक शर्माने 74 धावांची धमाकेदार खेळी केली. तो भारताच्या विजयाचा हिरो होता. भारताने सुपर-4 मोहिमेची सुरुवात विजयाने केली. या आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध हा भारताचा दुसरा विजय आहे. यापूर्वी भारताने ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव केला होता.

नाणेफेक गमावल्यानंतर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. फखर जमान 9 चेंडूत 15 धावा करून बाद झाला, त्याची विकेट 21 धावांवर पडली. त्यानंतर साहिबजादा फरहान आणि 21 धावांवर बाद झालेल्या सॅम अयुब यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी झाली. मोहम्मद नवाजनेही 21 धावांचे योगदान दिले. या सामन्यात हुसेन तलतने सर्वांना निराश केले, त्याने 11 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. शेवटी सलमान अली आगा 17 तर फहीम अश्रफने 8 चेंडूत २० धावा करून पाकिस्तानचा धावसंख्या 170 च्या पुढे नेला. भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, शिवम दुबेने सर्वाधिक 2 बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने 24 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि 39 चेंडूत 74 धावा काढून बाद झाला. या खेळीदरम्यान, त्याने सहा चौकार आणि पाच षटकार मारले. त्याचा साथीदार गिल 28 चेंडूत 47 धावा काढून बाद झाला. गिलने त्याच्या खेळीत 8 चौकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यात आपले खातेही उघडू शकला नाही, तीन चेंडूंनंतर एकही धाव न काढता बाद झाला. ओमानविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा सॅमसन 17 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. शेवटी हार्दिक आणि तिलक यांनी पुनरागमन करून भारताला विजय मिळवून दिला. तिलक वर्मा 30 तर हार्दिक 7 धावांवर नाबाद राहिले.

Comments are closed.