वेळेवर कर्ज, वेळेवर प्रगती : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आर्थिक बळ
भारतामध्ये सुमारे 6.7 कोटी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आहेत. हे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जातात. स्थानिक बाजारपेठेत ते रोजगार निर्माण करतात आणि लाखो लोकांना उत्पन्न देतात. आकडेवारी पाहिली, तर देशातील नोंदणीकृत सुमारे 6 कोटी एमएसएमई उद्योग जवळपास 25 कोटी लोकांना रोजगार देतात. त्यामुळे शेतीनंतर हेच क्षेत्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रोजगार निर्माते क्षेत्र ठरले आहे. तरीदेखील यातील तब्बल 99 टक्के उद्योग सूक्ष्म श्रेणीत येतात. देशाच्या एकूण उत्पादनात (जीडीपी) त्यांचे सध्या सुमारे 30 टक्के योगदान आहे. त्यांचा विकास साधल्यास त्यांच्या या योगदानात लक्षणीय वाढ करता येईल.
लघु व्यवसायांच्या वाढीस आडकाठी ठरणारा मुख्य अडथळा म्हणजे बँकांसारख्या औपचारिक संस्थांकडून त्यांना वेळेवर कर्ज न मिळणे. सूक्ष्म उद्योग लघु श्रेणीत, तर लघु उद्योग मध्यम श्रेणीत गेलेल्यांची संख्या अनुक्रमे केवळ 2372 आणि 17745 इतकी आहे. एकूण संख्येच्या तुलनेत हे आकडे फारच कमी आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे कर्ज मिळण्यात होणारा विलंब. बँकांकडून कर्ज मंजुरी व वितरण यासाठी काही आठवडे किंवा महिने लागतात. तोपर्यंत मोसमी मागणीची किंवा मोठ्या ऑर्डरची संधी हुकते. त्यामुळे एमएसएमई उद्योजकांना त्वरीत व सुलभ कर्जप्राप्ती होणे हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. याच दृष्टीने त्वरित कर्जपुरवठा आणि डिजिटल सुविधा यांचा मोठा उपयोग होतो.
एमएसएमई क्षेत्राला वेळेवर कर्जाची गरज का?
मोठ्या कंपन्यांकडे जादा भांडवल आणि साधने उपलब्ध असतात. परंतु एमएसएमई उद्योग मर्यादित साधनांवर काम करतात. त्यांना नीट चालू राहण्यासाठी आणि संधींचा पूर्ण उपयोग करण्यासाठी सातत्यपूर्ण भांडवलाची गरज असते. उत्सवकाळातील किंवा मोसमी मागणी ही अशीच एक संधी असते. मग तो वाहनांचे सुटे भाग बनविणारा कारखाना असो, कपड्यांची किरकोळ दुकाने असोत किंवा एखादे खानावळीचे हॉटेल असो, लाखो एमएसएमई उद्योजक अशा मागणीमुळे फायदा घेऊ शकतात. त्यासाठी पुरेसा साठा, कच्चा माल, योग्य यंत्रसामग्री, कामगार वगैरे गोष्टी लागतात. अशा वेळी तातडीने मिळालेली व्यवसाय कर्जे अत्यंत उपयुक्त ठरतात. नवीन पिढीतील फिनटेक एनबीएफसी संस्था अशा कर्जाची जलद उपलब्धता देतात. त्यामुळे एमएसएमई उद्योजक वेळ न दवडता उत्पादन वाढवून संधीचा लाभ घेऊ शकतात.
कर्जपुरवठ्यातील डिजिटल क्रांती
एमएसएमई उद्योगांना वेळेवर कर्ज मिळावे यासाठी अर्ज शक्य तितकी सोपी आणि प्रक्रिया वेगवान असणे आवश्यक आहे. डिजिटल व्यवहारांमुळे हे शक्य झाले आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय कुटुंबे स्मार्टफोन व इंटरनेट वापरण्यात अधिकाधिक पारंगत झाली आहेत. आज जवळपास 85 टक्के घरांमध्ये किमान एक स्मार्टफोन आहे आणि 86 टक्के घरांमध्ये इंटरनेटची सुविधा आहे. एमएसएमई उद्योजकसुद्धा यूपीआयसारख्या साधनांचा वापर करू लागले आहेत. बहुतांश मालक आपल्या मोबाईलद्वारे व्यवसायाचे प्रसारकार्य करतात. आता मोबाईलवरूनच कर्जासाठी अर्ज करता येतो. कागदपत्रांचा बोजा कमी झाला आहे आणि शाखेत वारंवार धावपळ करण्याची गरज राहत नाही. अनेक डिजिटल कर्जपुरवठादार प्रादेशिक भाषेतही सेवा देतात, त्यामुळे संवादातील अडथळे कमी झाले आहेत. नवउद्योजकांचा विश्वास अशा प्रकारे जिंकण्यात आलेला आहे.
काही नवीन कर्जपुरवठादार स्वयंचलित प्रणाली आणि माहितीआधारित मूल्यांकाची पद्धत वापरतात. त्यामुळे कर्जमंजुरी आणखी जलद व कार्यक्षम होते. यातून एमएसएमई उद्योजकांना सहज, जलद आणि आवश्यक त्या वेळीच कर्ज मिळते.
फारच कमी परिणाम
एमएसएमई उद्द्योजकांना त्वरित भांडवल मिळाल्यास त्याचे परिणाम दूरवर पोहोचतात. उत्पादन व विक्री वाढल्याने अधिक कामगारांची गरज निर्माण होते. पुरवठादार, वाहतूकदार, स्थानिक बाजारपेठाही यातून लाभ मिळवतात. त्यामुळे संपूर्ण समाजजीवनात आर्थिक गती निर्माण होते. उत्सवकाळातील किंवा मोसमी मागणीला एमएसएमई उद्योजक सामोरे जाऊ शकले की स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम बनते.
विशेषतः महिला उद्योजकांसाठी डिजिटल कर्जपुरवठा हा मोठा बदल ठरला आहे. अनेक महिला लहान दुकाने, शिवणकाम केंद्रे किंवा घरगुती उद्योग चालवतात. पण कर्जासाठी गहाण ठेवण्याजोगी मालमत्ता नसणे, प्रवासाची अडचण आणि लिंगाधारित अडथळे यामुळे त्यांना औपचारिक कर्ज मिळणे अवघड होते. डिजिटल कर्जामुळे त्यांच्यासाठी दारे खुली होतात. त्यातून त्या आपला व्यवसाय वाढवतात, इतर महिलांसाठी संधी निर्माण करतात आणि आपल्या कुटुंब-समाजाचा जीवनमान सुधारतात.
निष्कर्ष
भारताच्या एमएसएमई क्षेत्राच्या स्वप्नांना गती देण्यासाठी वेळेवर व सुलभ कर्जप्राप्ती हाच मुख्य उपाय आहे. त्यामुळे उद्योजक संधी साधून सातत्याने वाढ करू शकतात. हे लघु उद्योग सक्षम झाले की अर्थव्यवस्था बळकट होते आणि संपूर्ण समाज उन्नत होतो. डिजिटल कर्जपुरवठ्यामुळे एमएसएमई उद्योजकांसाठी वित्तपुरवठा कधी नव्हता इतका सोपा आणि जलद झाला आहे. मात्र, या क्षेत्राची व्यापक व्याप्ती लक्षात घेता, सर्व उद्योजकांपर्यंत अशा सोयी पोहोचवणे अत्यावश्यक आहे. योग्य वेळी योग्य कर्ज उपलब्ध झाल्यास भारताच्या एमएसएमई क्षेत्राची असीम क्षमता पूर्णत्वास जाऊ शकते.
आणखी वाचा
Comments are closed.