पाकिस्तानचा पराभव आणि पुन्हा कुरकुर! ICCसमोर उभा राहिला नवा वाद
आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 6 गडी राखून हरविले. या पराभवानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा रडगाणे सुरू केले असून, आता त्यांनी नव्या मुद्द्यावरून आयसीसीचे दार ठोठावले आहे.
सलमान आगाच्या संघाने फखर जमनच्या कॅचबाबत तक्रार नोंदवली आहे. 14 सप्टेंबरच्या पराभवानंतर पाकिस्तानने “नो हँडशेक” वादावरून आयसीसी आणि एसीसीकडे धाव घेत भारतीय संघाच्या वर्तणुकीबाबतही तक्रार केली होती. सुपर-4 फेरीत अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलसमोर पाकिस्तानचे गोलंदाज पूर्णपणे निःशब्द दिसून आले होते.
आशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीत टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान पुन्हा एकदा बिथरला आहे. पाकिस्तानने फखर जमनच्या कॅचप्रकरणी आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबीचे म्हणणे आहे की थर्ड अंपायर रुचिरा पल्लियागुरुगे यांनी फखर नॉटआउट असतानाही त्याला आउट दिले. प्रत्यक्षात पाकिस्तानच्या डावाच्या तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याच्या एका चेंडूला फखरच्या बॅटचा कड लागला आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. संजू सॅमसनने पुढे झेपावत अफलातून कॅच पकडला.
ऑन-फिल्ड अंपायरने हा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवला होता, जिथे रिप्ले पाहिल्यानंतर सलामीवीराला बाद घोषित करण्यात आलं. मात्र, फखर थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे पूर्णपणे आश्चर्यचकित आणि संतप्त दिसत होता. त्याच वेळी पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक माइक हेसन हाही या निर्णयामुळे नाराज दिसून आला.
भारतीय संघाने सुपर-4 फेरीतील सामन्यात पाकिस्तानला अगदी सहज 6 गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना शेजारी देशाच्या फलंदाजांनी 20 षटकांत 5 गडी गमावत स्कोअरबोर्डवर 171 धावा उभारल्या होत्या. संघाकडून साहिबजादा फरहानने उत्कृष्ट फलंदाजी करत 45 चेंडूत 58 धावांची दमदार खेळी साकारली होती.
सैम अय्यूबने 21 धावांचे योगदान दिले होते. मात्र, 172 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने तब्बल 7 चेंडू राखून सहज पूर्ण केले. अभिषेक शर्माने तडाखेबाज शैलीत खेळ करत केवळ 39 चेंडूत 74 धावांची विस्फोटक खेळी साकारली. तर शुबमन गिलने 28 चेंडूत 47 धावा फटकावल्या.
Comments are closed.