अभिषेक शर्मा अन् शुभमन गिलनं विजयाचा पाया रचला, इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द पुरस्कार तिसऱ्याच खेळाडूला


दुबई: भारत आणि पाकिस्तान आशिया चषकात 2025 मध्ये सुपर -4 मध्ये रविवारी आमने सामने आले होते. या सामन्यात भारतानं  पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत केलं. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या संघानं 5 बाद 171 धावा केल्या. तर, भारतानं 19 व्या ओव्हरमध्येच 6 विकेटनं  विजय मिळवला. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा या दोघांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. अभिषेक शर्मानं 39 बॉलमध्ये 74 धावा 6 चौकार आणि 5 षटकारांसह केल्या.  तर, शुभमन गिल यानं 28 बॉलमध्ये 8 चौकारांच्या जोरावर 47 धावा केल्या.  भारताच्या विजयाचा पाया रचणाऱ्या अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोघांना इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला नाही. भारतीय ड्रेसिंग रुममध्ये हा पुरस्कार भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या तिलक वर्माना देण्यात आला. बीसीसीआयनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Impact Player of the Match : इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅचचा विजेता कोण?

तिलक वर्मान पाकिस्तान विरुद्ध संयमी आणि तितकीच आक्रमक फलंदाजी केली. कॅप्टन सूर्यकुमार यादव खातं न उघडता बाद झाल्यानंतर तिलक वर्माच्या खेळीमुळं भारत विजयापर्यंत पोहोचला. तिलक वर्माला अगोदर संजू सॅमसन आणि नंतर हार्दिक पांड्यानं साथ दिली. तिलक वर्मानं 19 बॉलमध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं नाबाद 30 धावांची खेळी केली. संजू सॅमसन यानं 17 बॉलमध्ये 13 धावा केल्या. या दोघांनी 25 धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्यासोबत 26 धावांची भागीदारी तिलक वर्मानं केली. तिलक वर्मानं शाहीन आफ्रिदीला षटकार आणि त्यानंतर चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानवर सलग सातव्यांदा विजय मिळवला आहे.

भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात 15 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी 12 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, पाकिस्ताननं 3 सामन्यात विजय मिळवला.

आशिया चषकात भारतानं आतापर्यंत ग्रुप स्टेजमध्ये 3 सामन्यात विजय मिळवला. भारतानं ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान, यूएई आणि ओमानवर विजय मिळवला. तर, सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. भारतानं पाकिस्तानला सुपर फोरमध्ये पराभूत केलं. आता भारतापुढं बांगलादेश आणि श्रीलंका यांचं आव्हान असेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.