Asia Cup: भारताविरुद्ध ‘गन सेलिब्रेशन’ करणाऱ्या साहिबजादा फरहानने अखेर मौन सोडलं, जाणून घ्या नेमकं काय म्हणाला?

आशिया कपमध्ये (Asia Cup) आतापर्यंत 2 वेळा भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना झाला आहे आणि दोन्ही वेळा काही ना काही वाद निर्माण झाले. सुपर-4 च्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात साहिबजादा फरहानच्या ‘गन सेलिब्रेशन’ची सर्वाधिक चर्चा झाली. खरं तर, फरहानने आपलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बॅट बंदुकीसारखी धरत सेलिब्रेशन केलं होतं. आता स्वतः साहिबजादा फरहानने त्या ‘गन सेलिब्रेशन’वर प्रतिक्रिया दिली आहे.

फरहान म्हणाला की, त्याच्या मनात आले, म्हणून त्याने ते सेलिब्रेशन केलं. लोकांची त्यावर काय प्रतिक्रिया येईल, याची त्याला पर्वा नाही. त्याने असंही म्हटलं की, तो आणि त्याची टीम आक्रमक स्वभावाने क्रिकेट खेळावी अशी त्याची इच्छा आहे.

फरहान म्हणाला, ते सेलिब्रेशन फक्त त्या क्षणी मनात आलेल्या भावनेतून झालं. मी सहसा अर्धशतक झाल्यावर असं काही करत नाही, पण त्या क्षणी अचानक विचार आला की चला आज असं करून बघू आणि मी केलं. लोकांची प्रतिक्रिया काय असेल, हे मला माहिती नव्हतं आणि खरं सांगायचं तर मला त्याची पर्वा नाही.

साहिबजादा फरहानने पाकिस्तानला वेगवान सुरुवात करून दिली होती. त्याच्या 58 धावांच्या खेळीमुळे पाकिस्तान 171 धावांचा मोठा स्कोर उभारू शकला. पण नंतर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि शुबमन गिलच्या (Shubman gill) वादळी फलंदाजीमुळे भारताने हा सामना सहज जिंकला.

साहिबजादा फरहान एकटाच नाही, तर आणखी एक पाकिस्तानी खेळाडू वादात सापडला. हारिस रऊफलाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. कारण, विराट कोहलीच्या चॅण्ट्सवर त्याने लढाऊ विमान कोसळवल्याचा इशारा केला होता.

Comments are closed.