निवृत्त झंझावाताचे पुनरागमन, क्विंटन डीकॉकची वन डे निवृत्तीतून माघार; पाकिस्तान दौऱ्यासाठी संघात झाली निवड

दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डीकॉकने दोन वर्षांपूर्वी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, मात्र हा झंझावात पुन्हा एकदा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये धडकण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने आता आपला निर्णय मागे घेतला असून, त्याची पाकिस्तानविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. यासोबतच तो नामिबियाविरुद्धच्या एकमेव टी-20 सामन्यातही खेळणार आहे.
विश्वचषकानंतर घेतली होती निवृत्ती
डीकॉकने 2023 च्या वन डे विश्वचषकानंतर 50 षटकांच्या क्रिकेटला अलविदा केला होता, तर दक्षिण आफ्रिकेसाठी त्याचा शेवटचा सामना 2024 टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना होता. जरी त्याने टी-20 क्रिकेटमधून अधिकृत निवृत्ती घेतली असली तरी तो सीपीएलसह जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळत होता.
मुख्य प्रशिक्षकाचा खुलासा
दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी सांगितले, ‘क्विंटनचे पुनरागमन आमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. गेल्या महिन्यात आम्ही त्याच्याशी भविष्याबद्दल चर्चा केली होती आणि तेव्हा त्याच्यात अजूनही देशासाठी खेळण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा असल्याचं स्पष्ट झालं.
2027 वर्ल्ड कपमध्ये खेळणार?
निवृत्ती मागे घेताना डीकॉकने संकेत दिला होता की दक्षिण आफ्रिकेत 2027 मध्ये होणारा वर्ल्ड कप खेळण्यासाठी त्याची मनधरणी केली जाऊ शकते. त्यासंदर्भात तो म्हणाला होता, ‘आता मला तसं घडेल असं वाटत नाही, पण आयुष्यात काहीही घडू शकतं. ही शक्यता असू शकते, पण खात्री नाही.
Comments are closed.