'जीएसटी बाचाट' महोत्सव सुरू झाला

पंतप्रधान मोदी यांचे भारतीय नागरिकांना प्रकट पत्र, प्रत्येक राज्याच्या विकासासाठी करसुधारणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने वस्तू-सेवा कर प्रणालीत केलेल्या सुधारणांचा शुभारंभ सोमवारपासून करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तू आणि सेवांवरील करांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पार्श्वभूमीवर ‘जीएसटी बचत उत्सवा’चा प्रारंभ केला असून भारताच्या सर्व नागरीकांना एक प्रकट पत्र लिहिले आहे. देशातील सर्व राज्यांच्या विकास साधण्यासाठी वस्तू-सेवा कर प्रणालीत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यांचा खरेदीदारांना मोठा लाभ होणार असून त्यांनी या सुधारणांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नवरात्र उत्सवा’च्या प्रथम दिनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मी आपल्या सर्वांना हा सणासुदीचा कालावधी सुख, सौख्य आणि भरभराट देणारा ठरो, अशी प्रार्थना करीत आहे’, अशा शब्दांमध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नवरात्र उत्सवानिमित्त ‘जीएसटी बचत उत्सव’ देशभर साजरा करण्यास प्रारंभ झाला आहे. केंद्र सरकारने वस्तू-सेवा कर प्रणालीत ज्या सुधारणा केल्या आहेत, त्यांचा लाभ शेतकरी, मध्यमवर्गिय, खरेदीदार, महिला, युवावर्ग, व्यापारी आणि लघु आणि मध्यम उद्योग या साऱ्यांना होणार आहे. त्यांनी तो घेण्यास सज्ज रहावे, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

देशवासीयांना पत्र

केंद्र सरकारने केलेल्या करसुधारणांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऱ्या देशवासीयांना एक प्रकट पत्र लिहिले आहे. या पत्रात या करसुधारणांचे कोणते लाभ सर्वसामान्यांना होणार आहेत आणि ते कशाप्रकारे होणार आहेत, याची माहिती देण्यात आली आहे. करसुधारणा करुन सरकारने जनतेची महत्वाची मागणी पूर्ण केली असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

त्रिपुरामध्ये घोषणा

नवरात्रोत्सवाच्या प्रथम दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातील राज्य त्रिपुराला भेट दिली आहे. त्यांनी या राज्यातील व्यापारी आणि उत्पादकांची, तसेच छोटे उद्योजक आणि त्यांच्यात काम करणारे कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकारच्या पुढाकाराने जीएसटी करप्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी पाच स्तरीय असणारी ही प्रणाली आता तीन स्तरीय करण्यात आली आहे. 12 टक्के आणि 28 टक्के हे दोन स्तर काढून घेण्यात आले असून आता सर्व वस्तू आणि सेवा या मुख्यत: 5 टक्के आणि 18 टक्के या स्तरांमध्ये आणण्यात आल्या आहेत. 40 टक्के कराच्या स्तरात मुख्यत: चैनीच्या वस्तू. तंबाखू मद्य आदी शरिराला अपायकारक असणाऱ्या पदार्थांवर लावला गेला आहे. उद्योजकांना याचा लाभ होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत अडीच लाख कोटी रुपये प्रवाहित करण्यात आले आहेत. आज सर्वसामान्य भारतीयांच्या हाती अधिक पैसा खेळत असून ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतील आणि हा सणासुदीचा कालावधी अधिक आनंदाने साजरा करतील, असे प्रतिपादन त्यांनी या चर्चेत केले आहे.

खरेदी वाढण्याची आवश्यकता

केंद्र सरकारने कर कमी करुन बाजारात वस्तू स्वस्त होतील, या दृष्टीने पावले उचलली आहेत. मात्र, सरकारच्या या धोरणाला जनतेनेही तितकाच उत्कट प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. लोकांनी खरेदीचे प्रमाण वाढविल्यास वस्तू आणि सेवा यांना अधिक मागणी निर्माण होईल. त्यामुळे या वस्तूंच्या उत्पादनाला वेग येईल. तसे झाल्यास उत्पादनवाढ होऊन अर्थव्यवस्था अधिक गतीमान होईल, असे अर्थतज्ञांचे मत आहे. अर्थव्यवस्थेची प्रगती करण्यासाठी सरकारने त्याचे उत्तरदायित्व पार पडले आहे. जनतेनेही तिचे पार पाडावे, असे तज्ञांचे मत आहे.

नव्या वस्तू-सेवा करपर्वाला प्रारंभ

ड सोमवारपासून नवा वस्तू-सेवा कर लागू. अनेक वस्तू होत आहेत स्वस्त

ड वस्तूंचे दर कमी झाल्याने खरेदी वाढणे शक्य, अर्थव्यवस्था वेगवान होणार

ड दर कमी झाल्याने मागणी वाढण्याची आणि उत्पादन वाढण्याचीही शक्यता

Comments are closed.