देशभरात नवीन जीएसटी दर लागू झाले

जागृतीसाठी भाजपकडून विशेष मोहीम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोमवार, 22 सप्टेंबरपासून तूप आणि चीजपासून कार आणि एसीपर्यंत बऱ्याच वस्तू खरेदी करणे स्वस्त झाले आहे. सरकारने 3 सप्टेंबर रोजी जीएसटी कपात जाहीर केल्यानुसार ‘घटस्थापने’पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता जीएसटी फक्त 5 टक्के आणि 18 टक्के अशा दोन स्लॅबमध्येच लागू करण्यात आला आहे. करप्रणाली सुलभ केल्यामुळे ग्राहकांना लाभ होत असून यासंबंधीच्या जनजागृतीसाठी भाजपच्यावतीने देशभर जनजागृती केली जात आहे. भाजपचे मंत्री, खासदार आणि अन्य नेते सोमवारी आपापल्या मतदारसंघात लोकांमध्ये जीएसटी कपातीबाबत लोकांना माहिती देताना दिसून आले.

जीएसटी कौन्सिलच्या 56 व्या बैठकीत जीएसटी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. जीएसटी कौन्सिलने कारपासून स्वयंपाकघरातील वस्तूंपर्यंत अनेक घटकांवरील जीएसटी दर कमी केले. बहुतेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी केल्याने किमतींमध्येही घट झाली आहे. या माध्यमातून मध्यमवर्गाला सर्वात मोठा फायदा होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात खरेदी वाढल्यामुळे ग्राहकांना आणि पर्यायाने सरकारलाही मोठा लाभ होऊ शकतो.

Comments are closed.