13 वर्षांचा मुलगा विमानाच्या मागच्या चाकात लपून अफगाणिस्तानातून दिल्लीला पोहोचला, वाचा पुढे काय घडलं?

अफगाणिस्तानातील एका १३ वर्षीय मुलाने विमानाच्या मागच्या चाकात लपत दिल्ली गाठली. आश्चर्याची बाब म्हणजे हा मुलगा एकदम सुखरूप आहे. ही घटना (२१ सप्टेंबर) ला घडली. द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना अफगाणिस्तानातील खाजगी विमान कंपनी केएएम एअरच्या आरक्यू४४०१ या विमानाशी संबंधित आहे. हे विमान काबुल विमानतळावरून सकाळी ८:४६ वाजता (हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार) निघाले आणि सकाळी १० वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

विमान उतरल्यानंतर आणि सर्व प्रवासी उतरल्यानंतर, टर्मिनल ३ वरील टॅक्सीवेवरील एका ग्राउंड हँडलरला विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्रात एक मुलगा भटकताना दिसला. तपासादरम्यान असे आढळून आले की, या मुलाने प्रवाशांसह काबुल विमानतळावर प्रवेश केला होता. तसेच विमानाच्या मागील बाजूस असलेल्या चाकाजवळ लपला होता. कुर्ता-पायजमा घातलेल्या मुलाने स्पष्ट केले की, त्याचा खरा हेतू इराणला पळून जाण्याचा होता. परंतु तो चुकून चुकीच्या विमानात चढला आणि दिल्लीत पोहोचला.

या घटनेमुळे काबुल विमानतळाच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुलाने सर्वात धोकादायक मानल्या जाणाऱ्या ठिकाणी लपून प्रवास केला होता. अहवालानुसार, विमानचालन तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन म्हणाले, “जेव्हा विमान उड्डाण करते तेव्हा चाके आत वळतात आणि एक दरवाजा बंद होतो. हे शक्य आहे की, मुलगा त्या बंदिस्त क्षेत्रात लपला होता. त्याठिकाणी थोडी हवा असते आणि तापमान केबिनसारखेच सामान्य राहते. तो संपूर्ण उड्डाणादरम्यान कोणत्या तरी वस्तूला किंवा विमानाच्या भागाला पकडून बसलेला असावा.”

सुरक्षा दलाने मुलाला ताब्यात घेतले असून, त्याला विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सूत्रांनी पुष्टी केली आहे की, मुलावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही कारण तो अल्पवयीन आहे. हिंदुस्थानातील ही दुसरी घटना आहे. पहिली घटना १९९६ मध्ये घडली होती जेव्हा दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात दोन भावांना पळवून नेण्यात आले होते. त्यापैकी एकाचा लंडनमध्ये मृत्यू झाला, तर दुसरा वाचला होता.

Comments are closed.