खालिदच्या जामिनाच्या मुद्दय़ावर दिल्ली पोलिसांना नोटीस

आता 7 ऑक्टोबरला सुनावणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2020 मधील दिल्ली दंगलीचा कट रचल्याप्रकरणी जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद, शरजील इमाम, मीरन हैदर आणि गुलफिशा फातिमा यांच्या जामीन अर्जांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस जारी करत मत मागवले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती, परंतु काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांचे खंडपीठ जामीन अर्जांवर सुनावणी करत आहे.

जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद, शरजील इमाम, मीरन हैदर आणि गुलफिशा फातिमा यांच्या जामीन अर्जांवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली. दिल्ली दंगल प्रकरणातील बहुतेक आरोपी विद्यार्थी असून पाच वर्षांपासून तुरुंगात आहेत, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. जामिनासाठी अर्ज करणाऱ्यांवर बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत आरोप आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये ईशान्य दिल्लीत झालेल्या जातीय हिंसाचारामागील कथित मोठ्या कटाशी संबंध असल्यामुळे त्यांना जामीन देण्यास वेळोवेळी न्यायालयाने नकार दिलेला आहे. यापूर्वी, 2 सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सात आरोपींना जामीन नाकारला होता.

Comments are closed.