‘पॉड टॅक्सी’ नागरिकांच्या सेवेत आणा, देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; कुर्ला ते वांद्रेदरम्यान प्रवासासाठी नवा पर्याय

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी नागरिकांच्या सेवेत आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे पॉड टॅक्सीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ‘बिझनेस डिस्ट्रिक्ट’मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या ठिकाणी भविष्यात होणारे बुलेट ट्रेन स्थानक, मुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागातील नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या परिवहन सेवेवर यामुळे ताण येऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भविष्यात या भागात नागरिकांना विनाविलंब आणि सहजरीत्या परिवहन सेवा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी पर्याय ठरेल, असे फडणवीस म्हणाले.

या भागाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता पॉड टॅक्सीची सेवा जागतिक दर्जाची राहील याची काळजी घेण्यात यावी. स्टेशनबाहेर असलेले स्कायवॉक आणखी उपयोगात आणण्यासाठी चांगल्या संकल्पनांची अंमलबजावणी करावी, असेही फडणवीस यांनी सांगितले.

या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग आदी उपस्थित होते. बैठकीत संजय मुखर्जी आणि देवेन भारती यांनी सादरीकरण केले.

सिंगल कार्डमध्ये सर्व परिवहन सेवा

मुंबईमध्ये सर्व परिवहन सेवांमध्ये सिंगल कार्डच्या माध्यमातून प्रवास करता येण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. याच सिंगल कार्डद्वारे पॉड टॅक्सीची सेवाही नागरिकांना घेता आली पाहिजे, या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. पॉड टॅक्सीच्या अनुषंगाने कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा विकास करण्यात यावा. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील इमारती या पॉड टॅक्सीने स्टेशनला जोडण्यात याव्यात, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

Comments are closed.