भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी फुटली
अंदमान-निकोबार बेटावरील घटना : गेल्या आठवडाभरात दोन स्फोट झाल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था/ पोर्ट ब्लेअर
अंदमान आणि निकोबारमधील बॅरेन बेटावर गेल्या आठ दिवसांत दोनवेळा स्फोट झाल्याने तेथील ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. हे भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखीचे ठिकाण आहे. 13 आणि 20 सप्टेंबर रोजी झालेल्या स्फोटामुळे या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. यादरम्यान झालेले दोन्ही स्फोट सौम्य असल्यामुळे सद्यस्थितीत आजूबाजूच्या परिसराला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.
बॅरेन बेट हे पोर्ट ब्लेअरपासून सुमारे 138 किलोमीटर अंतरावर आहे. येथे दक्षिण आशियातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. हे अंदाजे 3 चौरस किलोमीटरचे निर्जन बेट असून ते ज्वालामुखीच्या राखेने आणि खडकांनी व्यापलेले आहे. हे बेट 354 मीटर उंच आहे आणि ते अंदमान-निकोबार बेटांचे एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. येथे हिरवळ किंवा मोठी झाडे नाहीत, फक्त काही झुडुपे आणि पातळ गवताळ वनस्पती असल्यामुळे हे ठिकाण राहण्यायोग्य नाही. तरीही हे बेट अंदमान आणि निकोबार बेटांचेच एक अद्वितीय अंग मानले जाते. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा ज्वालामुखी शास्त्रज्ञ आणि प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
प्रशासकीय नोंदींनुसार, येथे पहिला उद्रेक 1787 मध्ये झाला होता. तेव्हापासून हा ज्वालामुखी अनेकवेळा सक्रिय झाला आहे. अलिकडेच, 2017 आणि 2022 मध्ये मोठे उद्रेक झाले. यावर्षी जुलैमध्येही क्रियाकलाप नोंदवल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
Comments are closed.