ओला, उबर, रॅपिडोला कॅबचालकांचा हिसका, सरकारी नियमाप्रमाणे प्रवासी भाडे आकारणार; ’ओन्ली मीटर’ वेबसाईटवर सुधारित दरांचा तपशील

जादा प्रवासी भाडे आकारून प्रवाशांची लूट करणाऱ्या ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या अ‍ॅग्रीगेटर्सना कॅबचालकांनीच हिसका दिला आहे. तिन्ही कंपन्यांनी अद्याप आपल्या अ‍ॅपमध्ये सरकारने ठरवलेले दर अंतर्भूत केलेले नाहीत. वारंवारच्या नोटिसांनंतरही त्या कंपन्यांची मनमानी सुरूच आहे. याचा प्रवाशांना फटका बसू नये म्हणून राज्यभरातील कॅबचालकांनी मंगळवारपासून ‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळाचा वापर करून सरकारी नियमाप्रमाणे प्रवासी भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवहन विभागाने ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या अ‍ॅग्रीगेटर्सना सुधारित भाडेदर निश्चित करून दिले आहेत. मात्र त्यानुसार भाडेआकारणी न करता जादा दर आकारले जात आहेत. त्या तुलनेत कॅबचालकांना मोबदला कमी देत आहेत. त्यामुळे कॅबचालकांमध्ये ओला, उबर, रॅपिडोविरोधात असंतोष धगधगता राहिला आहे. ओला, उबरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवांच्या चालकांना प्रति किमी 8 ते 9 रुपये इतका मोबदला दिला जातो. त्यात इतर वाहतूक खर्च असल्याने चालकांचे नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर कॅबचालकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.

सुधारित प्रवासी भाडे

  • हचबॅक म्हणजेच व्हॅगन-आरसारख्या छोट्या गाड्यांसाठी 28 रुपये प्रति किलोमीटर.
  • सेडान म्हणजेच स्विफ्ट डिझायरसारख्या मध्यम गाड्यांसाठी 31 रुपये प्रति किलोमीटर.
  • एसयूव्ही म्हणजेच आर्टिगासारख्या मोठ्या गाड्यांसाठी 34 रुपये प्रति किलोमीटर.

ओला, उबर, रॅपिडोची मनमानी सुरूच आहे. त्याचा कॅबचालक आणि प्रवाशांना फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांनी ओला, उबर वा इतर अ‍ॅपवरून कॅब बुकिंग केल्यानंतर त्या अ‍ॅपवरील भाडे न घेता ‘ओन्ली मीटर’ संकेतस्थळावरून भाडे आकारणार आहोत, असे भारतीय गिग कामगार मंच अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

कठोर कारवाई करणार

रिक्षा-टॅक्सीसाठी परिवहन विभागाने निश्चित केलेले दर अ‍ॅग्रीगेटर्सला लागू असणार. टॅक्सीसाठी प्रतिकिमी 20.66 रुपये, तर एसी टॅक्सीसाठी प्रतिकिमी 22.72 रुपये दर निश्चित केला आहे. या सुधारित दरपत्रकाचे पालन न केल्यास परिवहन विभागाद्वारे ओला, उबर, रॅपिडोवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तिन्ही कंपन्यांना प्रत्येक फेरीद्वारे गोळा केलेल्या भाड्याच्या किमान 80 टक्के रक्कम चालकांना देणे बंधनकारक आहे.

Comments are closed.